मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा: जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.२७: मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, आपल्या इतिहासाचा अभिमान आहे आणि आपल्या भविष्यासाठीची प्रेरणाशक्ती आहे. मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा, अशा प्रेरणादायी शब्दांत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना मराठी संवर्धनाचा संदेश दिला.  जिल्हा मराठी भाषा समिती, शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर व जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ व भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त तालुकास्तरीय स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचा हा भव्य कार्यक्रम शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघामध्ये उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राजाराम महाविद्यालयाचे मराठी व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य अत्यंत प्रभावी शब्दांत उलगडले. ते म्हणाले, मराठी भाषा अतिशय गोड, मदनमोहक, सुंदर आणि समृद्ध आहे. ही भाषा सौंदर्यांनी नटलेली आहे, भावनांनी भरलेली आहे, पराक्रमाने गाजलेली आहे. नवरसांनी चिंब भिजलेली अशी ही भाषा आपल्या जीवनाला अर्थ देते, विचारांना दिशा देते आणि मनाला संस्कार देते. म्हणूनच मराठी भाषा ही जपलीच पाहिजे.त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांच्या मनात मराठीबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला. भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.