मुंबई :प्रतिनिधी
दि.२३: चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेस (CASMB), मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्रतिष्ठेचा “उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवॉर्ड” यंदा चकोते ग्रुपचे चेअरमन, उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नितेश भारद्वाज (महाभारत मालिकेतील श्रीकृष्ण भूमिका) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र व शिल्ड असे होते.अंधेरी येथील भारत रत्नम सभागृहात येथे झालेल्या या भव्य सोहळ्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पश्चिम विभागीय संचालिका प्रिती चौधरी तसेच Institute of Chemical Technology चे कुलपती पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी हे प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात CASMB चा सहावा स्थापना दिन तसेच “प्रेरणा महिला सक्षमीकरण शिखर परिषद” देखील पार पडली. CASMB चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हालदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर निलेश लेले यांनी आभार मानले.
परिषदेत डॉ. शिल्पा वोरा (मेरिको लि.), विजय सिरसाठ (महाराष्ट्र शासन), अश्विनी पाबळे (रेवंता फॅशन्स प्रा. लि.) आणि मुबारका लोखंडवाला (MML ग्लोबल अॅडव्हायझरी) यांनी महिला उद्योजकांसाठी नवोन्मेष, धोरण सहाय्य व विकासाच्या संधी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी आण्णासाहेब चकोते यांनी आपल्या उद्योगांद्वारे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
चकोते यांनी उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले असून ग्रामीण भागातील हजारो महिला, युवक व दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात यांसह देशभरातील वितरकांमार्फत त्यांच्या बेकरी, नमकीन व स्वीट उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. तसेच त्यांच्या उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रवेश केला आहे.
नांदणीसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. तसेच ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सिनियर व्हाइस प्रेसिडेंटपदी त्यांची सलग नवव्यांदा निवड झाली असून, बेकरी उद्योगातील उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य ते करत आहेत.
देशपातळीवरील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत CASMB संस्थेने त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.