इचलकरंजीत रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 
 दि.२३:इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.यावेळी जागतिक शांतता, देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहावा आणि सर्व संकटे दूर व्हावीत, यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.कार्यक्रमास प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

             बयान जामे मस्जिदचे इमाम मौलाना आशिकईलाही रफिक शेख यांनी मार्गदर्शन केले, तर नमाज पठण हजरत सय्यद मगदुम वली दर्ग्याचे इमाम हाफीज महमद जाकिरहुसेन शेख यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

नमाजानंतर युवकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सेल्फी काढण्यात उत्साह दाखवला.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) यांच्या वतीने ईदगाह मैदानावर नमाजासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प व शरबत वाटप करून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.