इचलकरंजीत तरूणाचा भर रस्त्यात तलवारीने वार करून खून

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा नोंद , घटना स्थळी जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट

इचलकरंजी: संजय आंबे

येथील स्टेशन रोडवरील हॉटेल जमजम समोर शनिवारी दि.१६ रात्री संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४२, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) याचा तलवारीसह धारदार शस्त्राने निर्घुन खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सदर प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे याच्यासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार पडली होती. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. खूनाच्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जमावाने संशयितांच्या घरांवर तसेच दुकांनावर दगडफेक व जाळपोळ केली. आज सकाळीही स्टेशनरोड परिसरात हातगाड्यांची मोठी तोडफोड करण्यात आली. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी संतोष उर्फ पप्पू जाधव याचे जवाहनगर येथे हॉटेल आहे. हॉटेलमधील कामगार व संशयित काणे यांच्यात वाद झाला होता. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंद दाखल झाला होता. यातील काही संशयितांचा सायंकाळी पोलिस शोध घेत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पप्पू जाधव हा मित्रांसमवेत हॉटेल सोनाली परिसरातून जात असताना हल्लेखोरांनी त्याला गाटले.शुभम काणे, आदित्य सुतार आदी सह संशयितांनी तलवार, कोयता, चाकू यांचा वापर करीत जाधव यांचा हल्ला केला. त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. त्यानंतर संशयीतांनी त्याच्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला. घटनेनंतर संशयितांनी तलवार घटनास्थळी टाकून पलायन केले.

जाधवला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी रात्री उशीरा घोषित केले. जाधवचा डोके, चेहरा, दोन्ही हात, छाती आदी शरिराच्या विविध ठिकाणी तब्बल चौदाहून अधिक वार केले आहेत. जाधव याच्या खुनाच्या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. खूनाच्या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयितांची घरे लक्ष केली.जवाहनगर येथील मुख्य संशयित शुभम काणे याच्या घरावर दगडफेक तसेच घरातील साहित्य पेटविण्यात आले. त्यापाटोपाट गणेनगर येथील आणखी एका संशयिताच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काणे याच्या भाजीपाला विक्रीच्या दुकानाची तोडफोड करून पेटवून देण्यात आली. त्याचबरोबर आदर्श झोपडपट्टी परिसरातील संशयिताच्या मोटरसायकलची तोडफोड करण्याबरोबर त्याच्या घरातील साहित्यही पेटवून देण्यात आले.

त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिसरातील पोलिस ठाण्यांकडून जादा पोलिस कुमक मागवण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील तपासाच्या सूचना दिल्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. शोकाकूल वातावरणात संतोष उर्फ पप्पू जाधव याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×