इचलकरंजी: संजय आंबे
दि 27 काही कारणास्तव पूरग्रस्त नागरिक आणि उद्योग, व्यवसायांना मदत मिळालेली नाही किंवा मिळाली ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे. म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करुन त्रुटी दूर करुन सर्वांनाच नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करु. शॉप अॅक्ट असो किंवा नसो सर्वांनाच मदत मिळवून दिली जाईल. कोणीची अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी येथे बोलताना दिली.
जुलै 2021 मध्ये इचलकरंजी शहर व परिसरामध्ये आलेल्या महापूरामुळे पूर परिसरातील यंत्रमागधारक, व्यापारी, इतर उद्योजक व दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाले. या सर्वांना राज्य शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली होती. त्यानुसार नुकसानीचे पंचनामे झाले. परंतू पूर परिसरातील अनेक यंत्रमागधारक, व्यापारी, इतर उद्योजक व दुकानदार यांची नांवेच यादीमध्ये नाहीत किंवा पूरग्रस्त लोकांना मिळालेली मदत तुटपूंजी आहे, यासंदर्भात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये अप्पर तहसिलदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त यंत्रमागधारक, व्यापारी, इतर उद्योजक व दुकानदार यांची बैठक पार पडली. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते.
प्रारंभी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत जवळपास 300 जणांची यादी अप्पर तहसिलदार यांना दिल्याचे सांगितले. तर माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते आणि काही पूरग्रस्त यंत्रमागधारकांनी आपल्या व्यथा मांडताना मागील सरकारने दिलेल्या मदतीपेक्षा आताच्या सरकारकडून मिळालेली आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगितले. महापूर ओसरल्यानंतर 22 दिवसांनी पंचनामे करण्यात आले. तोपर्यंत अनेकांनी साफसफाई करुन कारखाने सुरु केले होते. कारखान्यांचे पंचनामे करताना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत माहितीची व्यक्ती घेऊन पंचनामे करणे गरजेचे होते. प्रति यंत्रमाग किती खर्च आला याची माहिती घ्यावी, त्यासाठीची संपूर्ण बिले अर्जासोबत जोडून देऊ. त्यानुसार फेरतपासणी करुन अनुदान द्यावे, अशी मागणी केली.
आमदार आवाडे म्हणाले, महापूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी पाणी पातळीत गतीने वाढ झाली, पण ते अत्यंत संथगतीने ओसरले. इचलकरंजीसह चंदूर, रुई भागातही महापूराचा फटका बसला. सर्वांनाच नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण आग्रही होतो. त्याला अप्पर तहसिलदार शरद पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाले, यादी तयार झाली. परंतु शॉप अॅक्ट नाही म्हणून काहीजणांना तर पंचनामा होऊनही यादीत नांव नसल्याने काहीजणांना नुकसान भरपाई मिळाली नाही. अशा सर्वांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यासाठी आपल्याकडे काही पुरावा, फोटो असेल त्यासोबत अर्ज करावा. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. एकाच ठिकाणी जादा युनिट असतील त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावीत. शासन दरबारी आदेशात काही सुधारणा करण्याची गरज असेल तर आपण त्यासाठी पाठपुरावा करु आणि दिवाळीच्या आत सर्वांना मदत मिळवून देऊ आणि अधिकाधिक कसे मिळेल यासाठी प्रयत्न करु. पंचनामे करताना काही त्रुटी झाल्या असतील, पण त्यामध्ये सुधारणा करुन जे वंचित आहेत त्यांची फेरतपासणी करुन मदत मिळवून दिली जाईल.
अप्पर तहसिलदार शरद पाटील यांनी, महापूरानंतर 15 पथकांद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. प्रारंभी घराचे पंचनामे करण्यात आल्याने व्यवसाय, दुकानांचे पंचनामे करण्यास विलंब झाला. 12 बलुतेदार, दुकाने आणि टपरी अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार 1400 व्यावसायिकांपैकी 821 जणांना मदत दिली गेली असून 600 जणांना अद्याप दिली गेली नाही. ज्या काही तक्रारी असतील त्याची फेरतपासणी करुन शहानिशा केली जाईल. ज्यांचे पंचनामेच झाले नाहीत त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल. तर दुसर्या मजल्यावरील जवळपास 2 हजार कुटुंबांचा सर्व्हे करुन यादी शासनाकडे पाठविली आहे. शासनाकडून आदेश येताच त्यांनाही निश्चितपणे मदत दिली जाईल, असे सांगितले.
याप्रसंगी अहमद मुजावर, पॉवरलूम असोशिएशनचे व्हा. चेअरमन दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, नारायण दुरुगडे, सोमाण्णा वाळकुंजे आदी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Next Post
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.