इचलकरंजी: विजय मकोटे
भुवनेश्वर (ओरिसा) येथे दि. 22 ते 26 सप्टेंबर, 2021 दरम्यान ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धांचे (कुमार व मुली) आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या संघांची नुकतीच घोषणा करण्यात आली.
यापैकी कुमार संघामध्ये डायनॅमिक स्पोर्ट्सच्या अनिकेत अशोक चनविरे याची निवड झालेली आहे.
अनिकेतने आजपर्यंत स्थानिक, जिल्हा व विभागीय पातळीवर अनेक स्पर्धांमधून आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन घडवले असून आता तो प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आपला खेळ दाखविण्यास सज्ज झाला आहे.
अनिकेत यास डायनॅमिक स्पोर्ट्सचे कार्यवाह प्रा. शेखर शहा यांचे सहकार्य मिळाले तर मंडळाचे खो खो प्रशिक्षक अमोल अडसुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
डायनॅमिक स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, सुनील पाटील, अतुल बुगड, डॉ. राहुल कुलकर्णी यांनी अनिकेतचे अभिनंदन केले.
नुकत्याच आलेल्या महापुरामध्ये अनिकेतचे घर पाण्यात बुडाले होते, तरीसुद्धा त्यावर मात करून, अनेक अडचणींचा सामना करीत अनिकेतने आपला सराव चालू ठेवला. अशा जिद्दी खेळाडूला राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाल्याने अनिकेतचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.