निकोप आणि निर्भीड समाज घडविण्याची जबाबदारी महिलांची
सौ. नंदिनी (काकी) वैभव नायकवडी यांचे प्रतिपादन
शिरोळ : विजय धंगेकर
दि : ९ मार्च कोरोनाने सर्वांनाच एका पातळीवर आणले आहे. नात्यांमध्ये जवळीकता आली, एकमेकांमध्ये सहवास निर्माण झाला. जे चांगले, सुंदर आणि सकारात्मक आहे तेच आत्मसात करून चांगला समाज निर्माण होऊ शकतो. निकोप आणि निर्भीड समाज घडविण्याची जबाबदारी महिला उत्तमरीत्या पार पाडू शकतात, असे प्रतिपादन हुतात्मा बझार वाळव्याच्या कार्यवाह सौ. नंदिनी (काकी) वैभव नायकवडी यांनी केले.
श्री दत्त भांडारच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षा म्हणून श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे उपस्थित होत्या. तर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्राचीन भारतीय संस्कृती विद्याकेंद्र कोल्हापुरचे संस्थापक नारायण गुरुजी यांनी यावेळी ध्यान, प्राणायाम, आहारशास्त्र याविषयी सखोल मार्गदर्शन केले. जीवनविद्या मिशनच्या सौ. स्वाती पाटील यांनी सुख, संगत, संवाद, सकारात्मक विचार, सहनशक्ती आधी गोष्टींचा आपल्या जीवनातील उपयोग स्पष्ट करा. एडवोकेट दिलशाद मुजावर यांनी एकविसाव्या शतकातील नारी शक्ती आणि महिला सबलीकरण या विषयी बोलताना मुलांच्यावरील संस्कार आणि नात्यांमधील संवाद हरवत चालल्याचे सांगितले. महिलांच्या अस्तित्वाचा आणि स्वतंत्रतेचा संघर्ष आजही सुरू असून आपल्या सुरक्षिततेसाठी सजग बनावे तसेच प्रसंगी दुर्गेचा अवतार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी ‘सकाळ’चा हिरकणी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दीपा भंडारे, सौ. स्वाती पाटील आणि शीतल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. कन्या विद्या मंदिर दत्तनगरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक दत्त भांडारच्या संचालिका डॉ. राजश्री पाटील यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार सौ ए. आर. सुतार यांनी केले. यावेळी सौ. अनिता कोळेकर, माजी सभापती तथा काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. मीनाज जमादार, संचालिका सौ. संगीता पाटील कोथळीकर, सौ. यशोदा कोळी, जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे, सुहास मडिवाळ, बी. बी. पाटील, दिपक ढोणे, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, अंबादास नानिवडेकर, विश्वजीत शिंदे, संज्योत संकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दिनांक ७ मार्च रोजी महाराष्ट्रातील विविध पिकांच्या पारंपरिक व दुर्मिळ पीक वाणांचे प्रदर्शन आणि चर्चासत्र झाले. याचे उद्घाटन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेती शास्त्रज्ञ डॉ. बी. पी. पाटील होते. बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक संजय पाटील यांनी दुर्मिळ पीक वाणांच्या संदर्भामध्ये बहुमोल मार्गदर्शन केले. पीक वाणांच्या प्रदर्शनांमध्ये १५० प्रकारच्या भाताच्या जाती, नाचणी, वरी, मका, ज्वारीच्या पन्नासवर जाती तसेच कडधान्य पिके १००,कंद पिके आदींचा समावेश होता. या प्रदर्शनाला विद्यार्थी, महिला आणिशेतकरी बांधवांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.