माहिती व जनसंपर्कच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. 1 मे : कोरोना काळात राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले असले तरीही विकासकामांना कोणतीही खीळ बसणार नाही याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. सर्वच क्षेत्रात राज्याला पुढे ठेवले असून पुढेच राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि गेल्या दोन वर्षातील ठळक कामगिरीचे सचित्र दर्शन घडवणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते. पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री म्हणाले, आता कोरोनाच्या संकटातून आपण सावरलो असून विकासकामांवर अधिक जोमाने लक्ष देऊ. अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण कशी होतील यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
प्रदर्शनाची उत्तम मांडणी गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय योजना नागरिकांपर्यंत चांगल्यारीतीने पोहोचतील, अशी प्रतिक्रियादेखील श्री. पवार यांनी यावेळी दिली. त्यांनी प्रत्येक फलकाजवळ जाऊन सविस्तर माहिती घेतली.
यावेळी, प्रदर्शनामध्ये ३६० अंश सेल्फी पॉईंटवर आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या सेल्फी फलकाजवळ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मोबाईल सेल्फी चित्रफीत काढली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती कार्यालयामार्फत उभारण्यात आलेले हे आकर्षक प्रदर्शन ‘दोन वर्षे जनसेवेची; महाविकास आघाडीची’ ५ मे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.