पंचगंगा घाटावर एनडीआरएफ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर:प्रतिनिधी: जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोल्हापूर शहरातील पंचागंगा घाटावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) द्वारे पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी करवीर हरिश धार्मिक, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर, टीम कमांडर धर्मेद्र सेवदा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांचेसह आपदा मित्र, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटींच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले. महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसे वाचवावे, आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आली. पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे, बुडणाऱ्यांना लाईफ सेव्हर कसे पोचवावे किंवा आपदा मित्राने त्याचा कसा बचाव करावा, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या व पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे आणि त्याला प्रथमोपचार कसे करावेत, याची सर्व माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर पंचगंगा नदीमध्ये रबरी बोटींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

तसेच अडचणीच्यावेळी मदतीला कोणी उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध साहित्यामधून तयार केलेल्या वस्तूंच्या आधारे पाण्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठीचे केलेले प्रात्यक्षिक विशेष होते. यामधे वाळलेल्या नाराळांपासून, प्लास्टीक पाण्याच्या बाटल्यांपासून, प्लास्टीक कॅनपासून, थर्माकोल, पीव्हीसी पाईप, व्हॉलीबॉल, तसेच पाण्याच्या कळशांपासून तयार केलेले लाईफ जॅकेटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हे घरगूती तयार केलेल्या लाईफ जॅकेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात तात्पुरत्या मदतीसाठी होवू शकतो. यानंतर पाण्यात बुडालेल्या व झाडावर अडकलेल्या व्यक्तिंना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक झाले. यावेळी निखिल मुधोळकर यांनी प्रात्यक्षिकाचे संचलन केले.

विविध आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याच्या हेतूने करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन आपत्ती व्यवस्थान दल करणार आहे. दुखापत आणि आग इत्यादीपासून पीडितांना मदत करण्यासाठी ड्रिल, गळयात खाऊ अडकल्यावर काय करावे याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना घेऊन जाण्याचे व्यावहारिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. फ्रॅक्चर, सर्पदंश, दुखापत, आजारपणात बचावासाठी आणि इतर आपदा परिस्थितीत विद्यार्थ्यांना माहिती दिल्याने समाजात त्यांच्या मार्फत आवश्यक मदत वेळेत देणेस मदत होणार आहे

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×