मिरज:प्रतिनिधी
दि:१४:डिसेंबर: वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याने दोघांमधला संघर्ष ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील गत दहा वर्षांतील आकडेवारीही यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ जणांना जीव गमवावा लागला. आठ जण गंभीर जखमी झाले, तर ३९ जण किरकोळ जखमी झालेत.
शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले अधिक होत असल्याने शेतकरी संघटनेचे महादेव कोरे यांनी वन विभागाकडे माहिती अधिकारात हल्ल्यांबाबत माहितीची विचारणा केली होती. एप्रिल २०१३ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यानची प्राप्त माहिती धक्कादायक आहे. कडेगाव, शिराळा तालुक्यात प्रामुख्याने बिबट्या, तरस, रानडुकरांच्या हल्ल्यांची नोंद अधिक आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना आणि जखमी झालेल्यांना शासनाकडून ९३ लाख ५७ हजारांची भरपाई मिळाली आहे. मृतांत सांगली शहर परिसरात ६, कडेगाव ३, आटपाडी आणि शिराळा प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. कडेगावात १६, शिराळ्यात १५, सांगलीत १२, तर आटपाडीत ११ हल्ल्याच्या घटना घडल्याची नोंद वनविभागाकडे आहे.
जिल्ह्यात बिबट्या, रानडुक्कर, तरस या वन्यप्राण्यांचा वावर अनेक ठिकाणी वारंवार आढळून येत आहे. या प्राण्यांकडून मानवासह शेतातील वस्त्या, मेंढपाळांची पाले व गोठ्यातील लहान-मोठ्या जनावरांसह पशुधनावर हल्ला होत आहे. रानडुक्कर, हरणांमुळे पिकांची नासधूस होत आहे. तसेच एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०२३ या १० वर्षांच्या काळात वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात पाळीव प्राणी देखील दगावले आहेत.
वन्य प्राण्यांचे लोकवस्तीवरील हल्ले ही गंभीर बाब आहे. हल्ला झाल्यानंतर आर्थिक मदत इथंवरच न थांबता, ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर झालेले हल्ले आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यास वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा. सांगली, मिरज शहरात अनेक बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले. अशा घटना वारंवार घडत आहेत. लाख रुपयांची भरपाई देऊनही पुन्हा जीव मिळणार नाही.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.