नव्या रंगात नव्या ढंगात 13 सप्टेंबरपासून इचलकरंजी फेस्टिव्हल कार्यक्रमांची मेजवानी

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी 
दि .१२ : गणेशोत्सव व इचलकरंजी फेस्टिव्हल असे समीकरण बनलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४च्या निमित्ताने यंदा इचलकरंजीसह पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. १३ ते १६ सप्टेंबर असे ४  दिवस येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इचलकरंजी फेस्टिव्हल च्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० वर्षापासून इचलकरंजी फेस्टिव्हल चे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सव म्हटला की इचलकरंजी फेस्टिव्हल आलेच. आता हाच फेस्टिव्हल सोहळा नव्या रंगात व नव्या ढंगात पाहण्यास मिळत आहे. यानिमित्ताने कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शुक्रवार १३ रोजी सकाळी १० वाजता महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील अन्नपूर्णा स्पेशल स्पर्धेने इचलकरंजी फेस्टिव्हल चा श्रीगणेशा होईल. यामध्ये फ्रुट डेकोरेशन व सोयाबीन डिशचा समावेश असून एक तिखट पदार्थ असेल. तर दुपारी ४ वाजता मानाची श्रीगणेशाची महाआरतीने फेस्टिव्हलचा शुभारंभ होईल. त्यानंतर तरुणाईचे आकर्षण असलेल्या भव्य अशा पश्‍चिम महाराष्ट्र श्री व इचलकरंजी टॉप १० बॉडी बिल्डिंग स्पर्धा होईल.
शनिवार १४ रोजी दुपारी २ वाजता मिस अँड मिसेस इचलकरंजी स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्यांना सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते क्राउनिंग सेरेमन संपन्न होणार आहे. रविवार १५ रोजी महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धा होणार आहे. तर ५ वाजता सुप्रसिद्ध जादूगर जितेंद्र रघुवीर यांचा जादूचा कार्यक्रम होईल. सोमवार १६ रोजी सकाळी १० वाजता इचलकरंजी शाळा आणि महाविद्यालयातील मुला-मुलींचा ग्रुप डान्स कार्यक्रम होईल. तर दुपारी ४ वाजता घरगुती गणपती आरास डेकोरेशन स्पर्धा व गौरी सजावट डेकोरेशन स्पर्धा यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
सर्व कार्यक्रमास मोफत प्रवेश असून लकी ड्रॉ च्या माध्यमातून प्रेक्षकांना सिल्वर कॉईन जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे, असेही इचलकरंजी फेस्टिव्हल च्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांनी सांगितले. यावेळी अहमद मुजावर, शेखर शहा यांच्यासह नियोजन कमिटीचे सदस्य-सदस्या उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×