कुचांबे केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उत्साहात संपन्न

 

आरवली:(सचिन पाटोळे)

संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुचांबे येथे भव्य क्रीडांगणावर दि. 4 डिसेंबर 2024 रोजी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद केंद्र शाळा कुचांबेने केले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. केंद्रप्रमुख श्री. बाबासाहेब पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. निकिता कदम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजिवली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन पाटोळे उपस्थित होते. राजिवली गावच्या सरपंच सौ. दीपिका सावंत तसेच कुचांबे गावातील पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

क्रीडाज्योत प्रज्वलित करून व क्रीडाध्वजारोहणाने स्पर्धांना सुरुवात झाली. गोळा फेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी आणि धावणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

केंद्रशाळा कुचांबेचे सोनाक्षी गुरव, श्रावणी कदम, आर्या राक्षे, अक्षरा बागवे, रुद्र सुर्वे, गार्गी कदम व सार्थक लखन यांनी तसेच जिल्हा परिषद शाळा राजिवली नं. १ चे अनन्या पाटोळे, सोहम मालप, साहिल कदम, शिवराज पाटोळे, स्वराज सोलकर, सक्षम सावंत, आर्या पाटोळे व दक्ष पाटोळे यांनी विविध क्रीडा प्रकारांत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून बीटस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. केंद्रप्रमुख श्री. बाबासाहेब पवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील बीटस्तरीय स्पर्धेत यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांतही यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महाडिक सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गायकवाड सर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित पालक व ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×