कोल्हापूर:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: पंचगंगा नदीवरील सर्वात शेवटच्या तेरवाड बंधाऱ्यामध्ये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शिरोळ तालुक्यात मासे मरतुकीची घटना घडत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला मिळाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत तेरवाड बंधारा व आजूबाजुच्या परिसराची दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तात्काळ पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान तेरवाड बंधाऱ्याच्या मासे मरतुकीच्या ठिकाणी प्रथमदर्शनी पिवळसर काळे रंगाचे पाणी दिसून आले व त्यास घरगुती सांडपाण्याचा वास असल्याचे आढळले
त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांमार्फत इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील ताकवडेवेस पंपींग स्टेशन व महानगरपालिकेच्या हददीतून वाहणाऱ्या नाल्याची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान ताकवडे वेस येथील पंपींग स्टेशन बंद स्थितीत होते व तेथून घरगुती सांडपाणी विविध नाल्याव्दारे पंचगंगा नदीमध्ये मिसळताना आढळले. तसेच पाहणी दरम्यान नाल्यावर बसवण्यात आलेली तात्पुरती निर्जंतुकीकरण यंत्रणा चालू नसल्याचे निदर्शनास आले. तसेच म.प्र.नि.मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पृथ:करणासाठी नदीच्या पाण्याचे व नाल्यांच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आलेले असून ते पृथ:करणासाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन इचलकरंजी महानगरपालिकेस प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडून कलम ३३ अ जल (प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण ) कायदा १९७४ अन्वये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रस्तावित आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच यात सदयस्थितीत बंद असलेली सर्व यंत्रणा तात्काळ चालू करण्यात यावी व पंचगंगा नदीचे प्रदूषण होवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असे प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय यांनी कळविले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.