इचलकरंजी:विजय मकोटे
दि. ३ :”इचलकरंजी शहराला संस्थान काळापासून नाट्य, संगीत व कला परंपरा लाभलेली आहे आणि ती सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. हीच परंपरा जपण्यासाठी बालनाट्य स्पर्धेसारखे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. विद्यार्थ्यांच्यामधील कलागुणांचा विकास होण्यासाठीही या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. या नियोजनात महानगरपालिका सुरुवातीपासून सहभागी असून पुढील काळातही अशाच चांगल्या प्रकारे या स्पर्धा घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू” अशा आशयाचे उदगार येथील महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी काढले.
येथील अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी बालनाट्य स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने आयुक्त दिवटे बोलत होते. त्यापूर्वी त्यांच्या तसेच परीक्षक, रंगकर्मी अरुण पटवर्धन पुणे, किरणसिंह चव्हाण कोल्हापूर व संजय सातपुते इचलकरंजी यांच्या आणि संयोजक पदाधिकारी यांच्या हस्ते नटराज प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून बालनाट्य स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी मध्यवर्ती नाट्य परिषदेचे संचालक राजन मुठाणे यांच्या हस्ते गुलाब पुष्प प्रदान करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धा समन्वयक प्रा. मिलिंद दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी परीक्षकांचा परिचय कादंबरी माळी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष आबाळे यांनी केले. यावेळी नाट्य अभ्यासक प्रा. अशोक दास, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह संजय होगाडे, स्पर्धा समन्वयक कपिल पिसे, आदी उपस्थित होते. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी शहरातील विद्यार्थी आणि रसिकवर्ग उपस्थित होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.