नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा:प्रतिनिधी

दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती सोहळा राज्य शासन व सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने नायगाव (ता. खंडाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल
सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार महादेव जानकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे,महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते. माझ्यासाठी ते ऊर्जादायी आहेत. सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी
यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचे चैतन्य आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे
म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र घडला. आज महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. स्त्री शिक्षणातून महिला अबला नव्हे, तर सबला आहेत ही जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. हा इतिहास जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साताऱ्यात त्यांचे स्मारक सुस्थितीत
आणण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे.नौदलातील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करत आहे. त्यांचा आपल्याला अभिमान असून या सर्वांचे मूळ प्रेरणा स्त्रोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम आहे. सावित्रीबाई नसत्या, तर देश, समाज पन्नास वर्षे मागे गेला असता. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचे काम त्यांनी केले आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहायचे प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरी त्यांच्या विरोधात बंड करायचे ही शिकवण त्यांनी दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×