उत्पादन विक्रीसाठी गणपतीपुळ्यात महिलांना कायमस्वरूपी स्टॉल

पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी:सचिन पाटोळे 

दि. २५  : सरस विक्री व प्रदर्शन हे फक्त पाच दिवस चालते. ते कायमस्वरूपी चालण्यासाठी येत्या सहा महिन्यात कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या मार्फत गणपतीपुळे येथे विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच कल्पना पकये आदी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, गणपतीपुळे येथे एका वर्षाला १६ लाख भाविक व पर्यटक येतात संकष्टी व गणेश चतुर्थी ला लाखो भाविक येथे येतात. महिलांना कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास महिला सक्षम होण्यास मदत होणार आहे. मागील कित्येक वर्षे या कार्यक्रमास मी येत आहे. ज्या इमारतीमध्ये आपण प्रदर्शन भरवत आहोत, ती इमारत सी आर झेड मध्ये येते. त्यामुळे कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करुन देता येत नाहीत. यावर लवकर तोडगा काढून कायमस्वरूपी गाळे बांधणार आहोत. जेवढा निधी गाळे बांधकामासाठी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येईल.
जिल्ह्यातील २६७० महिलांना मोफत मोबाईल देण्यात येणार आहेत. या मोबाईल च्या माध्यमातून महिला सरकारशी बोलू शकतील. १५० कोटीचे कर्ज महिलांना मंजूर करून देण्यात आले आहे. त्यांचा धनादेश ही आज देत आहे. येत्या १५ दिवसांत महिला सक्षमीकरण योजना आणत आहोत, असेही पालकमंत्री म्हणाले.


मुख्य कार्यकारी श्री. पुजार म्हणाले, या ठिकाणी ७५ स्टॉल लावण्यात आले आहेत. पर्यटक व भाविकांनी स्टॉलला भेट देवून खरेदी करावी. ग्रामीण भागातील महिलांनी आपले उत्पादन शहरात आणून स्टॉलवर विक्री केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती घाणेकर यांनी तर, आभार प्रदर्शन श्री. पिरजादे यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×