अदितीताई, इकडे लक्ष द्याल का ?

विशेष लेख :
श्री. सिद्धांत निंबाळकर, उंचगाव, कोल्हापूर
              आज अंगणवाडी कर्मचारी या समाजाच्या आधारभूत घटक म्हणून कार्यरत आहेत. ‘कोरोना’च्या काळात या महिला कर्मचार्‍यांनी आरोग्य कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. ‘लाडकी बहीण’ योजना गोरगरीबांपर्यंत पोचवून त्यांना आधार दिला. या महिला कर्मचार्‍यांचा एक प्रश्न मात्र लालफितीत अडकला आहे. वर्ष २०१९ पासून अंगणवाडी कर्मचार्‍यांना त्यांच्या जवळच्या भागातच काम करता यावे, यासाठी ‘या कर्मचारी रहात असलेल्या परिसरातच अंगणवाडीत नियुक्त करावे’, असा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला; मात्र त्याच वेळी या कर्मचार्‍यांची बदली करण्याची मुभा काढून घेण्यात आली. त्यामुळे वर्ष २०१९ पूर्वी ज्या महिला कर्मचार्‍यांची ‘नंतर तुमच्या भागात बदली करून देऊ’, असे सांगून नेमणूक केली आहे, त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नासह या सेविकांच्या अन्य प्रश्नांसाठी २५ सप्टेंबरपासून गावोगावच्या महिला मुंबईत आंदोलन करत आहेत. 

                         कोल्हापूरचा पसारा मोठा आहे. काही अंगणवाडी कर्मचार्‍यांना सकाळी दीड तास आणि दुपारी दीड तास बसचा प्रवास करावा लागतो. त्यातच शहरातून उपनगरात जाणार्‍या बसची उपलब्धता कमी असल्याने बसची वाट पहाण्यात १ ते दीड तास जातो. त्यामुळे सकाळी ९:३० वाजता बाहेर पडलेली ही स्त्रीशक्ती सायंकाळी ४-५ वाजता घरी पोचते. गरीब घरातील या महिलांना नवरा, मुले यांचे सगळे आटोपण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच घरी आल्यानंतर भागातील लहान मुलांची वजने, माता यांची माहिती असणारी निरनिराळे रजिस्टर पूर्ण करण्यात, सरकारी ॲपवर माहिती भरण्यात आणि घरकाम करण्यात रात्रीचे १२ कधी वाजतात, तेच कळत नाही.
            या महिलांच्या बदल्या करण्याची परवानगी देणारा अध्यादेश तयार असल्याचे शासकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे. आता अनेक ठिकाणी अंगणवाड्यांवर नवीन सेविकांच्या नियुक्त्या होणार आहेत. त्यापूर्वी हा आदेश महिला आणि बालकल्याणमंत्री अदितीताई तटकरे यांनी लागू करायला हवा. त्यामुळे महाराष्ट्रातील शेकडो अंगणवाडी कर्मचार्‍यांचा प्रश्न सुटणार आहे. शासनाने या कर्मचार्‍यांना पगारवाढीचे आश्वासनही दिले आहे; मात्र ते पूर्ण करण्यासाठी सरकारला पैशांची गरज आहे. बदलीचा आदेश लागू करण्यासाठी मात्र कोणतीही तरतूद करावी लागणार नाही. सरकारचा कार्यकाल पूर्ण होत आहे, अशा वेळी २५ सप्टेंबरपासून या महिला मुंबईत आंदोलन करत आहेत. त्यामुळे अंगणवाडी महिलांचे हे या सरकारपुढील शेवटचे आंदोलन असणार आहे. अशा वेळी त्यांच्या सगळ्या मागण्या आणि मुख्यतः बदली करण्यासारख्या सुटता येणार्‍या मागण्यांकडे अदितीताईंनी जातीने लक्ष घालून अध्यादेश तात्काळ लागू करण्याचा आदेश द्यावा. असे केल्याने समाजोपयोगी कामात नेहमीच अग्रेसर असणार्‍या अंगणवाडीच्या ताईंना मोठा आधार मिळेल !

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×