प्रभात फेरीव्दारे एड्स जनजागृती
सांगली : प्रतिनिधी
दि. 1 : जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही. (एड्स) प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता होण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल सांगली) येथून प्रभात फेरी काढण्यात आली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी उपस्थितांना एड्स विरोधी शपथ देवून प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखविला.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी, कर्मचारी, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच 16 महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी कॅडेटची लक्षणीय उपस्थिती होती.
प्रभात फेरीची सुरूवात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथून करण्यात आली ही प्रभात फेरी पुढे आंबेडकर रोड – एसटी स्टँड- शिवाजी मंडई – हरभट रोड – राजवाडा चौक मार्गे पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन चौक सांगली येथे प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी एचआयव्ही प्रतिबंधाकरिता सर्व समुदायांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.