रोहित पवारांना पाडण्यासाठी अजितदादा अन् राम शिंदे यांचे प्लॅनिंग : नामचिन गुंडाच्या भावासोबत खलबत!
पुणे:प्रतिनिधी
दि:२२: फेब्रुवारी: राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोर लावायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार आणि शिंदे यांनी पुण्यातील नामचिन गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याची भेट घेतल्याचे फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. घायवळ बंधू हे मुळचे कर्जत-जामखेडमधील असल्याने ही भेट रोहित पवार यांनाच पाडण्यासाठी असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या भेटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दोघांच्याही भेटीचे फोटो शेअर करत लवांडे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामचीन गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ सोबत आज कसली मीटिंग केली असेल? कोणत्या सामाजिक विकासाची चर्चा झाली असेल? तसेच कर्जत जामखेड चे माजी आमदार राम शिंदे यांचेशी सुध्दा बैठक झाली ती कोणत्या सामाजिक विषयावर असेल? सेटिंग? असे सवाल त्यांनी या भेटीवर उपस्थित केले आहेत.
गत काही दिवसांपासून राजकीय नेते आणि गुंडांचे संबंध हा राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड मारणेची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरुन पार्थ पवारांवर त्यांच्याच पक्षातून टीका झाली. स्वतः अजित पवार यांनी देखील ही भेट चुकीची असल्याचे म्हटले होते. अशातच उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
याच घटनेनंतर विरोधकांकडून सरकार गुंडांना राजाश्रय देत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली होती. अशात संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसादिनी भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला. त्यानंतर लगेच कारवाईचे पाऊल उचलत ही भेट घडवून आणणाऱ्या अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी केली. मात्र आता स्वतः अजित पवार यांनीच नामचिन गुंडांची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.