आमदार प्रकाश आवाडे यांना सहकार भारतीतर्फे सर्वोच्च ‘कै.आण्णासाहेब गोडबोले’ पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि .१८:केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्राच्या सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना ‘कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार’ हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार २१ व रविवार २२ सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
सहकारात काही चांगले घडावे व नैतिकतेच्या तसेच सामाजिक जाणीवेच्या पायावरच ही चळवळ उभी रहावी असे मनापासून वाटणार्‍या काही प्रमुख मंडळींनी सन १९७८ मध्ये एकत्र येऊन ’सहकार भारती’ या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली. गेली ४६ वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू आहे.  सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने होणार्‍या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष ‘कै. अण्णासाहेब गोडबोले’ यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.
यंदाच्या पुरस्कारासाठी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांच्या समितीने ही निवड केली. या पुरस्कार निवडीचे पत्र आमदार आवाडे यांना सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, सहकार भारती कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जवाहर छाबडा, जिल्हा महामंत्री धोंडीराम पागडे व महाराष्ट्र प्रदेश महिला संस्था प्रकोष्ट प्रमुख सौ. वैशाली आवाडे यांनी दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×