महिला सबलीकरणासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे बँकेच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी बचत गटांना 25 लाखापर्यंतचा कर्जपुरवठा

बचत गटांना हवे ते सहकार्य देण्यासह उत्पादीत वस्तूंच्या मार्केटींगसाठी प्रयत्नशील आमदार आवाडे

इचलकरंजी: संजय आंबे
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन वर्षाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी बचत गटांना 25 लाखापर्यंतचा कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गटांना हवे ते सहकार्य देण्यासह उत्पादीत वस्तूंच्या मार्केटींगसाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार आवाडे म्हणाले.
येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नुतन प्रशासकीय इमारतीत नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत बँकेशी संलग्न महिला बचत गटाच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना चेअरमन आमदार आवाडे बोलत होते. यावेळी बँकेच्यावतीने बचत गटातील महिलांना दुर्गामातेची चांदीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
आमदार आवाडे म्हणाले, महिला सबलीकरणाचे ध्येय बाळगत महिलांना स्वावलंबी, उद्योजिका बनवावे यासह त्यांच्या आर्थिक व कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्यावतीने महिला बचत गटांसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला. आज 11 वर्षाच्या कालावधीत तब्बल 1700 महिला बचत गटाच्या माध्यमातून 20 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. या बचत गटांना 50 हजारापासून आजपर्यंत 5 लाखापर्यंत कर्जपुरवठा केला. आजवर सुमारे 29 कोटी रुपये बचत गटांना दिले असून महिलांनी कर्जाची वेळेवर परतफेड केल्याने एनपीए शून्य आहे. शहराच्या औद्योगिक विकासात महिलांचेही योगदान महत्वाचे आहे. आता महिलांनी स्वत: उद्योजिका बनावे यासाठी बँकेने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येक बचत गटाला 25 लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 10 वर्षाची मुदत असणार आहे. यापूर्वी दिलेल्या कर्जासाठी शासन पातळीवरुन 7 टक्के व्याज परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठीही शासन पातळीवरुन व्याज सवलत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना मार्केटींगसाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी अभ्यासगटही नेमला आहे. देशाच्या उभारणीत, प्रगतीत व अर्थकारणात महिलांनी सक्रीय व्हावे या संदर्भातील भूमिका घेऊन आमची वाटचाल सुरु असून त्यासाठी महिलांनीही सहकार्य करण्याचे आवाहन आमदार आवाडे यांनी यावेळी केले.
प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश व आजवरच्या बचत गटाच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर आदींसह विविध बचत गटांच्या प्रमुख उपस्थित होत्या. आभार नजमा शेख यांनी मानले.