भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

३५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले वर्गमित्र

 

कडवई:

कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या १९९० च्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी जल्लोषात संपन्न झाला.

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या बॅचच्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थित वर्गमित्रांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. त्यानंतर माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, तसेच १९९० च्या बॅचमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये कारगिल युद्धात सहभागी झालेले जीवन साळुंके, संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम करणारे कमलाकर सुर्वे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मंजुळा साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पुरी, आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये कार्यरत सत्यवान ब्रीद यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तसेच २०२३-२४ शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थी व पीएसआय म्हणून निवड झालेल्या तेजल शिंदे हिचा विशेष सत्कार झाला. दिवंगत मित्रांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांनी मैत्रीचे महत्त्व सांगत असे मेळावे आठवणींना उजाळा देतात, असे मत व्यक्त केले. माजी शिक्षक पांडुरंग जाधव यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने कार्यरत राहून यशस्वी होण्याचा सल्ला दिला. मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी शाळेतील उपक्रम व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची माहिती दिली.

संध्याकाळच्या सत्रात सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा परिचय करून दिला. मुनीर हुजरे यांचा संदेश ऐकून सर्वांना शाळेच्या आठवणींनी भावूक केले. कित्येक वर्षांनी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान ब्रीद यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कानाल, जीवन साळुंके, ज्योती घोसाळकर, रुपेश रहाटे, संजीव सुर्वे, जयवंत पवार, संतोष कदम, सूर्यकांत मिरगल, लक्ष्मण जोगले आणि मंगेश यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव वसंत उजगावकर, पर्यवेक्षक संतोष साळुंखे, आणि माजी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मराठी साहित्यिकांचे फोटो भेट देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाने माजी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेच्या आठवणींनी पुन्हा एकदा जवळ आणले. “काय बोलू आणि किती बोलू?” असा विचार साऱ्यांच्या मनात होता. या मेळाव्याच्या निमित्ताने ३५ वर्षांनंतरही मैत्रीची वीण अधिक घट्ट झाली.