संजय घोडावत इन्स्टिट्यूटची ‘इनक्युबॅशन हब संस्था’ म्हणून निवड

कोल्हापूर:संजय कांबळे 

दि .२० :महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या इनक्युबेशन उपक्रमांतर्गत, राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ची इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यातील विविध तंत्र शिक्षण संस्थांमध्ये स्टार्टअप, इनोव्हेशन आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने “भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, इंटरप्रेन्युअरशिप अँड लीडरशिप, पुणे” यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवकल्पना साकार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा मिळणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांमध्ये नवउद्योजकतेचा जागर निर्माण होईल.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने या उपक्रमासाठी सखोल अभ्यास करून संपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. या निवडीसाठी विभागप्रमुख प्रा. अजय बी. कोंगे तसेच पदविका अभियांत्रिकी विभागातील सर्व विभागप्रमुखांनी मोलाचे योगदान दिले.

संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले असून, भविष्यातील इनोव्हेशन आणि स्टार्टअप उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडीमुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूटची ओळख नवउद्योजकतेच्या केंद्रबिंदू म्हणून निर्माण होणार असून, विद्यार्थ्यांना नवीन तांत्रिक संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

# sanjay ghodawat#sgu#Kolhapur news#