मुंबई :
रेल्वेने दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिमगा सणाच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी १ मार्चपर्यंत गाड्या सुरू न झाल्यास दादर स्थानकावर ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अखेर गाड्या पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
शिमगा हा कोकणातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असल्याने या काळात मुंबईसह इतर शहरांतील अनेक लोक गावी परततात. कोरोना काळात बंद झालेल्या या गाड्या अद्याप सुरू झाल्या नव्हत्या. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहतूक, एस.टी. बस किंवा अन्य महागड्या पर्यायांवर अवलंबून राहावे लागत होते.
गेल्या काही वर्षांपासून गाड्या बंद असल्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासीय सुटकेचा निःश्वास टाकू शकतात.