प्रादेशिक परिवहन कार्यालयात MH-09-HB नवीन मालिका सुरु

कोल्हापूर: रेणू पोवार 

दि.३  : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९  च्या नियम ५४ (ए)(६ ) मधील तरतुदीप्रमाणे परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांचेकडून नवीन मालिका सुरु करण्याकरिता देण्यात आलेल्या परवानगीनुसार या कार्यालयात मुदतपूर्व नवीन मालिका MH-09-HB सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी अर्जदाराला गृह विभाग, महाराष्ट्र शासन राजपत्र, अधिसूचना दि.३० .०८.२०२४  मधील पोट-नियम (3) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शुल्काच्या तीनपट शुल्क प्रदान करावे लागेल. ज्या अर्जदारास नव्याने आगाऊ सुरु केलेल्या मालिकेमधील नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल अशा अर्जदाराला, मूळ मालिका पूर्ण होईपर्यंत पोटनियम (३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शुल्काच्या तीनपट दराने शुल्क प्रदान करावे लागेल.

       या कार्यालयामार्फत मुदतपुर्व नवीन नोंदणी क्रमांक मालिका MH-09-HB करिता कामकाज सुरु करण्यात आले आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज कार्यालयात सकाळी ९ .४५  ते दुपारी ३.००  या वेळेत खिडकी क्र.C-02 (रोखपाल कक्ष-CASHIER)  येथे स्विकारण्यात येतील.

 वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

         पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत गृह विभाग, महाराष्ट्र शासन राजपत्र, अधिसूचना दि.30  ऑगस्ट २०२४  अन्वये विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी तीनपट रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (चेक) किंवा पेऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRASS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८०  दिवसाच्या आत नोंदणी करुन घेतली नाही किंवा मालिका संपल्यानंतर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फीचा धनाकर्ष वाहनधारकाने फीची खात्री करुनच जमा करावा. प्रथम येणाऱ्या अर्जदारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.