अन्यायाविरोधातील लढ्याला यश – परितक्त्या आयेशा मोकाशींच्या संघर्षाला सीईओ कार्तिकेयन यांचा आधार

कोल्हापूर :रेणू पोवार 

दि .६ :  हक्कासाठी उभा राहिलेला आवाज कधीच वाया जात नाही” याची प्रचिती खिद्रापूर येथील परितक्त्या महिला आयेशा दादाखान मोकाशी यांनी घडवून आणली. प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करत न्याय मिळवण्यासाठी त्यांनी धैर्याने संघर्ष केला आणि अखेर त्यांच्या चिकाटीला यश मिळाले.

मागील १५ वर्षांपासून शालेय पोषण आहाराचा ठेका चालवत असलेल्या मोकाशी यांचा ठेका काही अधिकाऱ्यांच्या दबावामुळे व हेतुपुरस्सर रद्द करण्यात आला. निरक्षरतेचा गैरफायदा घेत झालेल्या फसवणुकीने त्यांची उपजीविका धोक्यात आली. मात्र, हार न मानता त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला प्रश्न विचारले.

या संघर्षाला नारी अत्याचार निवारण समितीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. गजाला मुल्ला आष्टेकर यांनी ठाम पाठिंबा दिला. “एका परितक्त्या महिलेला न्याय न देणारे प्रशासन कितपत संवेदनशील आहे?” असा त्यांचा सवाल जनमानसाला विचार करायला लावणारा ठरला.

या लढ्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन सर यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडेकर यांना तात्काळ फोन करून कारवाईच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर स्वतःहून पुन्हा फोन करून कारवाईची खात्री केली. जिल्हा परिषदेतील बैठकीत सीईओ कार्तिकेयन यांच्यासह अधीक्षक उदय सरनाईक, शालेय पोषण आहार प्रमुख कुंभार सर उपस्थित होते. या वेळी गजाला मुल्ला आष्टेकर यांचे पती मुबीन मुल्ला आष्टेकर यांनी संविधानिक भाषेत अधिकाऱ्यांना जाब विचारत न्याय मिळवून देण्याचा ठोस प्रयत्न केला.

अखेर न्यायाचा दिवा पेटला – आयेशा मोकाशी यांना त्यांच्या रोजगाराचा हक्क परत मिळाला. यानंतर गजाला मुल्ला आष्टेकर यांनी समाधानाने प्रतिक्रिया दिली –
“परितक्त्या महिलेला न्याय मिळवून देण्यात यश आले. सीईओ कार्तिकेयन सर व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”