कोल्हापूर :रेणू पोवार
दि .८ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आदर्श दूध संघ ठरला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य, योग्य दराची हमी, विविध अनुदान योजना, पशुवैद्यकीय सेवा आणि ग्राहकांसाठी नवीन दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती अशा उपक्रमांमुळे ‘गोकुळ’वरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे. या विश्वासाच्या बळावर संघाची भरारी सुरू असून येत्या ९ सप्टेंबर रोजी कागल येथील श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे होणाऱ्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार आहेत. चेअरमन नविद मुश्रीफ यांनी या सभेला सर्व संस्था प्रतिनिधी व उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
दूध उत्पादकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय
गाय व म्हैस दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ (१ सप्टेंबरपासून लागू).
जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ₹४०,००० वरून ₹५०,०००.
इमारत अनुदानात ₹८,००० ते ₹१०,००० वाढ.
वासरू संगोपन योजनेत ₹२,००० वाढ.
सभासदांना महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातून मिनरल मिक्स्चर ५०% सबसिडी दरात (₹७५). आतापर्यंत ₹७ कोटी रुपयांचे मोफत मिक्स्चर वितरित.
पशुखाद्य विक्री करणाऱ्या सचिवांना तीन महिन्यांसाठी कमिशन वाढ.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दरवाढ.
मुक्त गोठा अनुदान योजना सुरू.
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे बचत
करमाळा येथील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे संघाला दरवर्षी ७–८ कोटी रुपयांची बचत होणार आहे. वीज खर्चात झालेली कपात संघाची आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत करत आहे.
भविष्यातील योजना
गोकुळ चीज, आईसक्रिम यांसारखी नवीन उत्पादने बाजारात आणणार.
दुग्धजन्य उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याचा मानस.
गाभण जनावरांसाठी विशेष ‘प्रेग्नेंसी रेशन’ पशुखाद्य लवकरच उपलब्ध होणार.
संवादातून प्रश्न निरसन
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील १२ तालुक्यांत संपर्क सभांचे आयोजन झाले. उत्पादक व संस्था प्रतिनिधींनी थेट संवाद साधून प्रश्न, सूचना आणि अडचणी मांडल्या. स्थानिक पातळीवर त्यांचे निरसन झाले असून धोरणात्मक मुद्द्यांवर वार्षिक सभेत निर्णय होणार आहेत.
चेअरमन मुश्रीफ यांचे आश्वासन
“वार्षिक सभेत प्रत्येक उत्पादकाला प्रश्न विचारण्याचा व सूचना देण्याचा अधिकार आहे. समाधानकारक उत्तरे देऊन योग्य सुचना प्रत्यक्ष अंमलात आणल्या जातील. पारदर्शक कार्यपद्धती व उत्पादकांशी असलेला थेट संवाद हा संघाच्या प्रगतीचा आधार आहे,” असे नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
ही वार्षिक सभा गोकुळच्या भविष्यातील वाटचालीसाठी व उत्पादकांच्या हितासाठी निर्णायक ठरणार आहे.