पैगंबर जयंतीच्या निमित्ताने इचलकरंजीत सामाजिक सलोख्याचे दर्शन : पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता

हजारोंच्या उपस्थितीत सद्भावना रॅली
इचलकरंजीत: हबीब शेखदर्जी 
दि .८: वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदु-मुस्लिमच नव्हे तर सर्व समाजबांधव एकोप्याने रहात आहेत. हाच सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंडीत ठेवत साडेचार दशकांपासून मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती दिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेशोत्सवानंतर आयोजित करुन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पायंडा घालून दिला आहे. हाच पायंडा भविष्यातही अखंडीत राहिल, असा विश्‍वास कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. रॅलीच्या सुरुवातीला देशाची शान असलेला तिरंगा आणि मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का-मदिना यांची प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधत होते.
           ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त इचलकरंजी येथे सोमवारी चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर, आणि डॉ. झाकीर हुसेन तरुण मंडळाने या सद्भावना रॅलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये मीनाइया मस्जिद कलानगर, सुन्नी कुरेशी मस्जिद कोल्हापूर रोड, गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर व समस्त मुस्लिम समाज सहभागी झाला  होता.  या सद्भावना रॅलीचा शुभारंभ इंदिरानगर येथे पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
             प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती पाच सप्टेंबर रोजी होत. परंतु गणेशोत्सवामुळे समस्त मुस्लिम समाजाने गणेशोत्सवामध्ये पोलिसांवरील ताण कमी व्हावा व कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये या उदात्त हेतूने गणेशोत्सवानंतर शोभायात्रा काढली हे कौतुकास्पद आहे. जरी 5 सप्टेंबरला रॅली काढण्यात आली असती तरी ती शांतेतच निघाली असती असा विश्‍वासही पोलिस अधिक्षक गुप्ता यांनी व्यक्त केला.
          यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महेश चव्हाण, सचिन सुर्यवंशी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि प्रशांत निशाणदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत ज्येष्ठ नागरिक, युवकांसह, लहान बालके, महिला आणि हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधवानी सहभाग घेतला होता. घोडे, उंट यासह आकर्षक रथ यांचा रॅलीत समावेश होता. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा या देशभक्तीपर गीताने शोभायात्रेतील वातावरण न्हाऊन गेले होते. इंदिरानगर येथून सद्भावना रॅलीला सुरवात झाली. त्यानंतर थोरात चौक, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक मार्गे गावभागातील हजरत सय्यद मखदूम वली दर्गाह येथे रॅलीची दुवा पठण करुन सांगता करण्यात आली.
          स्वागत अजीज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम आत्तार यांनी केले. आभार जब्बार झारे यांनी मानले. रॅली यशस्वीतेसाठी  रियाज सपसागर, बशीर करडी, इफ्तियार खान, मुश्ताक जमादार, दस्तगीर आत्तार, शाकिरअली खान, मोहरतअली खान, शकिल खान, मुबीन बेपारी, कय्युम शेख, महमंद मकानदार, अल्लाबक्ष लक्षमेश्‍वर, ताजअहमद लक्षमेश्‍वर, फजलुल्ला शेख,  अब्दुलमजीद खुदावंत, इफ्तिखार मुल्ला यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.