इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि. 14 रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने व माध्यम प्रायोजक दै. महासत्ता यांच्या सहकार्याने येत्या १ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत रोटरी ट्रेडफेअर २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील केएटीपी (KATP) ग्राउंड, इचलकरंजी येथे सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यंदाचे हे प्रदर्शन रोटरी ट्रेडफेअरचे २५ वे वर्ष असून, इचलकरंजीतील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभणारे हे एकमेव व लोकप्रिय प्रदर्शन मानले जाते.
या ट्रेडफेअरमध्ये इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते व विविध संस्थांना आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांपर्यंत सादरीकरण करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू, गृहोपयोगी साहित्य, गारमेंट मशिनरी, दुचाकी, वॉटर प्युरिफायर, लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, शिक्षण, सोलर उत्पादने, अॅक्युप्रेशर बॉडी मसाज, व्यायामाची साधने, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाले व मुखवास आदींचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनात न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्स, शिवम इंटरप्रायजेस, सोलर टेक्नॉलॉजी, श्रीजी निटिंग, किचन ट्रॉलीज, युरेका फोर्ब्स, सुर्या वॉटर, पितांबरी, सीडब्ल्यूएच टेक्नॉलॉजी, सोफा फर्निचर, बेंगलोर साडी यांसह अनेक नामांकित कंपन्या व फर्मचे स्टॉल्स सहभागी होणार आहेत.
खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी, स्वादिष्ट व हायजेनिक पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे विविध फूड स्टॉल्स, आईस्क्रीम, फूड झोन तसेच मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांसाठी मिनी वर्ल्ड विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दररोज प्रवेश कुपनवर लकी ड्रॉ काढण्यात येणार असून आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये
दि. ०२/०१/२०२६ रोजी दुपारी १ ते २ : मेहंदी स्पर्धा
दि. ०२/०१/२०२६ रोजी दुपारी ३ ते ४ : टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा
दि. ०३/०१/२०२६ रोजी दुपारी ३ ते ४ : पाककला स्पर्धा
दि. ०४/०१/२०२६ रोजी दुपारी ३ ते ४ : संक्रांत सजावट स्पर्धा
या स्पर्धा केएटीपी ग्राउंड येथे होणार आहेत. स्पर्धकांनी नोंदणीसाठी संबंधित मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.
या ट्रेडफेअरमधून मिळणारा निधी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरण्यात येतो. यामध्ये गरजू नागरिकांना मदत, प्लास्टिक सर्जरी शिबिरे, शाळांना संगणक, बेंचेस व स्वच्छतागृहे, पोलिओ निर्मूलन, वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, व्यावसायिक पुरस्कार, शालेय व युवकांसाठी कला-क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी स्वावलंबन योजना, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, रोटरी अभ्यासिका केंद्र, दिव्यांगांसाठी उपक्रम, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वैद्यकीय तपासण्या, रक्तदान शिबिरे आदींचा समावेश आहे.
प्रदर्शनासाठी सुबक स्टॉल मांडणी, प्रशस्त व रुंद जागा, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटिंगने आच्छादित, २४ तास सुरक्षा व्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणा, दररोज स्टेज शो, कराओके, मिमिक्री कार्यक्रम व आकर्षक लकी ड्रॉ ही यंदाच्या ट्रेडफेअरची खास वैशिष्ट्ये असणार आहेत.
स्टॉल बुकिंगसाठी रो. संजय खोत, रो. महादेव खारगे, ट्रेडफेअर चेअरमन रो. पंकज कोठारी, को-चेअरमन रो. सत्यनारायण धूत तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या ट्रेडफेअरची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक, सेक्रेटरी पिरगोंडा (राजू) पाटील, ट्रेडफेअर चेअरमन पंकज कोठारी, शिवदास किंतुरे, मुकुंद माळी यांच्यासह रोटरीचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.