श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पारितोषिक वितरण समारंभ मोठया दिमाखात संपन्न

इचलकरंजी:विजय मकोटे

दि. ०२ जानेवारी २०२६ :स्वप्न त्यांचीच खरी होतात जे जागेपणी स्वप्न पाहतात,” असे प्रतिपादन रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, कुंभोज येथील मुख्याध्यापक सागर पंडित माने यांनी केले. ते येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ५८ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


कार्यक्रमाची सुरुवात श्री. ना. बा. एज्युकेशन संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे सागर माने तसेच प्रशालेच्या प्रशासकीय वर्गाच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका ए. एस. काजी यांनी केले. गुणवत्ता विकासासाठी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
क्रीडाविभाग प्रमुख बी. एस. माने यांनी खेळाडूंच्या यशाचा आढावा घेणारा क्रीडा अहवाल सादर केला. याचप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते “प्रशाला परिचय पुस्तिका” प्रकाशित करण्यात आली. पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख पाहुणे सागर माने यांनी आपल्या भाषणात जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्यातील समाजएकतेचा गुणगौरव तसेच गंगामाईंच्या समाजकार्याचा प्रभावी आढावा मांडला. सावित्रीमाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भद्रकाली ताराराणी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाजकार्याचे दाखले देत त्यांनी विद्यार्थिनींना प्रेरित केले. आजच्या काळातील आदर्श कसे शोधावेत, यासाठी त्यांनी महाराष्ट्र पोलिस अकॅडमीमध्ये अव्वल ठरलेल्या प्रियांका पाटील यांचे उदाहरण दिले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त सुरेंद्रकुमार बांगड यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून नवीन वर्षासाठी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यानंतर विविध क्रीडा, कला व शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले तर आभार उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी यांनी मानले. यावेळी संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन मारूतराव निमणकर, उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, विभाग प्रमुख बी. एस. माने, डी. डी. कोळी, के. ए. पाटील, व्ही. के. पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.