इचलकरंजी:प्रतिनिधी
दि: 8 नोव्हेंबर वारंवार खंडणीसाठी जर्मनी गँग कडून होत असलेल्या तगाद्याला कंटाळून येथील आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) या युवकाने आपल्यावर होणार्या अन्यायाबाबतची चिठ्ठी मृत्यूपूर्वी स्टेटसला ठेवून आत्महत्त्या केली. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीचे काम सुरू करण्यात आले आहे. गुन्हेगारांच्या खंडणीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्त्या केल्याचा इचलकरंजीतील हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
जवाहरनगर परिसरात आरोमा बेकरीजवळ आदित्य महाद्वार हा आई, वडिल यांच्यासमवेत राहतो. तो अकौटिंगचे काम करीत होता. रविवारी दुपारी त्याने आईला आजीकडे बाहेर जाण्यास सांगितले. तर वडिलांना बागेत जाण्यास सांगितले. त्यानंतर घरात त्याने गळफास घेवून आत्महत्त्या केली. प्रतिसाद न मिळाल्यामुळे नातेवाईकांनी कौले काढून घरात प्रवेश केल्यानंतर आत्महत्त्येची घटना उघडकीस आली. आत्महत्त्येपूर्वी त्याने मोबाईलवर मृत्यूपूर्वीची चिठ्ठी स्टेटसला ठेवल्याचे उघडकीस आले. काही मित्रांना ही चिठ्ठी दिसून आली. मात्र ते घरी पोहोचेपर्यंत आदित्यचा जीव वाचवू शकले नाहीत.
जर्मनी गँग मधील चौघांची नावे त्याने आपल्या चिठ्ठीत लिहिली असून यापूर्वीही सोन्याची अंगठी व 25 हजार रुपये धमकावून काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर पुन्हा खंडणी न दिल्यामुळे कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे हे कृत्य केल्याचे लिहून खाली सही केली आहे. ही चिठ्ठी सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. पोलिसांनी त्याचा मोबाईल घेतला. जवाहरनगर परिसरात 15 दिवसांपूर्वीच खुनाची घटना घडली आहे. त्या खुनाच्या तपासाचे आव्हान कायम असताना जवाहरनगरमध्ये पुन्हा गुन्हेगारांच्या त्रासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.