इचलकरंजी: संजय मकोटे
दि : 8 नोव्हेंबर महावितरणकडूनन जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वीज कनेक्शन तोडणे थांबविले जात नाही, तोपर्यंत कामकाज सुरु होऊ देणार नाही असा पवित्रा आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी घेतला. अखेर त्या संदर्भात हमी मिळाल्यानंतर समितीचे कामकाज सुरु झाले. त्याचबरोबर आमदार आवाडे यांनी आभारफाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, फासेपारधी समाजाची घरकुले, औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा आदी प्रश्नांसंदर्भात विस्तृत माहिती, त्यामधील अडचणी याचा ऊहापोह करत हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी विविध प्रश्नांची सविस्तर मांडणी करत त्या संदर्भात प्रशासन पातळीवरुन होत असलेली दिरंगाई, दुर्लक्षपणा याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, महावितरण कंपनी ज्या पद्धतीने आपल्या आधिकाराचा वापर करून आपली थकबाकी वसूलीसाठी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींनासुध्दा आपला थकित कर वसूल करणेचा अधिकार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील महावितरणच्या पोल, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्र, हायटेंशन पोल याचा थकित कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. या संदर्भात माणगांवचे सरपंच राजू मगदूम यांनी उपोषण आणि आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयानेसुध्दा ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करुन महावितरण थकबाकीसाठी वीज कनेक्शन तोडत आहेत. म्हणूनच जोपर्यंत महावितरणकडून ग्रामपंचायत हद्दीतील वीज कनेक्शन तोडणे थांबविले जात नाही, त्याची हमी दिली जात नाही तोपर्यंत समितीचे पुढील कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर उपस्थित मान्यवरांची चर्चा करुन त्या संदर्भात ग्वाही दिल्यानंतर कामकाज सुरु झाले.
इचलकरंजी शहरात 40 वर्षापासून फासेपारधी समाजाची 450 कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांनी जागा घेऊन एकत्रच वसाहत केली आहे. त्यांना दाखले मिळण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करुनसुध्दा ते काम अद्यापही अर्धवटस्थितीत आहे. शासनाकडून त्यांना घरकुलासाठी निधी उपलब्ध होत असतानाही नगरपरिषदेकडून मात्र प्रस्ताव पाठविला जात नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानेच तसा प्रस्ताव मागवून घेऊन तो शासनला पाठवावा आणि फासेपारधी समाजाला त्यांची घरकुले मिळवून द्यावीत असे सांगतानाच अशा कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविड काळात कंत्राटी पध्दतीने घेण्यात आलेल्या बहुतांशी कामगारांचा अनेक महिन्यांचा पगार प्रलंबित आहे. त्यांचा पगार तातडीने देण्यात यावा.
कबनूर, चंदूर व रुई या तिन्ही गावाची मिळून लोकसंख्या जवळपास एकालाखापेक्षा अधिक आहे. येथील ग्रामस्थांना कोविड प्रतिबंधक लस अथवा अन्य उपचारासाठी साजणी किंवा परिसरात जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी आभारफाटा येथे आमदार फंडातून महिला बचत गटासाठी हॉल बांधण्यात आला असून तो अद्यापही वापराविना आहे. त्याठिकाणी या तिन्ही गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात यावे आणि ग्रामस्थांची गैरसोय थांबवावी अशी मागणी केली. त्याचबरोबर शहर आणि परिसरात लहान लहान औद्योगिक वसाहती अद्यापही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. राज्य शासनाकडून त्यासाठी दोन वर्षापूर्वी निधी प्राप्त झालेला असतानासुध्दा संबंधित अधिकार्यांकडून तो दिला जात नाही किंवा कामे सुरु केली जात नाही हे दुर्दैवी आहे. प्राप्त झालेला निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
तर जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी, सन 2020 मधील अर्थसंकल्पात इचलकरंजी शहराला जोडणार्या रस्त्यांच्या कामांबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्या कामांची निविदा प्रक्रियासुध्दा झालेली असताना अद्यापही कामे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रलंबित कामे तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.