मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विभागात अनेक अभिनव योजना व उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो संस्था राज्यात कार्यरत असून, त्या सर्वांना एकत्र आणून कौशल्य विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा विभागाचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात काही नोकऱ्यांवर परिणाम होणार असला, तरी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या संधींचे सोने करण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रभावीपणे काम करीत असून महाराष्ट्रातील युवा शक्तीला जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात कुशल, प्रामाणिक आणि सक्षम मनुष्यबळ उपलब्ध असून जगभरातून या मनुष्यबळाला मागणी आहे. या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांनाही दर्जेदार मनुष्यबळ मिळेल. राज्यातील आयटीआय, इनोव्हेशन सेंटर्स आणि विविध कौशल्य यंत्रणांचे मोठे नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी विभाग काम करीत असून नावीन्य आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.