सांगली: अय्यान पटेल
दि.३०: सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनच्या अधिकाऱ्यांनी १५ मे पर्यंत संपूर्ण सांगली शहरातील गॅस पाईपलाईनची प्रलंबित कामे व कनेक्शनची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कचा जलद विस्तार करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आाढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन आणि पीएनजी याबद्दल जनजागृती व प्रसिद्धी महापालिका तसेच इतर संस्थांच्या मदतीने करावी. महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली रार्व स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वांना सोबत घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत. सीबीयुडी अॅपचा वापर करून सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनच्या अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण करावीत. सद्यस्थितीमध्ये एकूण ४२२ किलोमीटर गॅस पाईपलाईनच्या कागासाठी महानगरपालिका तसेच इतर संस्थांकडून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ३८० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून ४२ किलोमीटर पाईपलाईनचे काम बाकी आहे, ती कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सर्व संबंधित एजन्सी धारकांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल व या महिन्यांमध्ये देण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण झाल्याबद्दलचा आढावा घेण्यात येईल. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ३१ मे पर्यंतच्या ना हरकत परवानग्या देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.