श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.२५: श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव करत त्यांना भावी आयुष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, “बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवणे महत्त्वाचे असले तरी त्याबरोबरच बाह्य जगाचे ज्ञान आणि व्यवहारिक कौशल्य आत्मसात करणेही तितकेच आवश्यक आहे. शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिल्यास भविष्यात यश निश्चित मिळते.”कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली. उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी यांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाचे वाचन करत विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव केला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेक गुणवंत विद्यार्थिनींनी कॉलेजविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या यशामागील शिक्षक व पालकांच्या योगदानाचा उल्लेख केला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी यांनी विद्यार्थिनींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले.कार्यक्रमास संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन मारूतराव निमणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. इंगळे यांनी केले तर एस. एम. कवळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.