डीकेटीईच्या  टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची सियाराममध्ये निवड

इचलकरंजी:  हबीब शेखदर्जी

दि.१०ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची देशातील आघाडीच्या वस्त्रोद्योग समूहांपैकी एक असलेल्या सियाराम सिल्क मिल्स लि. यामध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी कंपनीच्या तारापूर (पालघर) येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात विविध पदांवर कार्यरत झाले आहेत.
सियाराम सिल्क मिल्स लि. ही भारतातील प्रतिष्ठीत वस्त्रोद्योग कंपनी असून प्रिमियम शर्टींग, सुटींग, फॅब्रिक्स आणि रेडिमेड प्ररिधान निर्मितीसाठी देशभरात ओळखली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने यामुळे कंपनीने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष स्थान निर्माण केले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील करिअरसाठी सियाराम ही विद्यार्थ्यांची पसंतीची कंपनी मानली जात आहे.
डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची सियारामने विद्यावेतनासह प्रशिक्षणासाठी निवड केली होती. प्रशिक्षणादरम्यान कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजार विद्यावेतन तसेच राहण्याची मोफत सुविधा देण्यात आली होती. प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची, कामातील गुणवत्ता, चांगल्या कामगिरीची दखल घेत कंपनीने शैक्षणिक गुणवत्ता व एकूण कार्यक्षमतेचे मूल्यमापन करुन त्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. या प्लेसमेंटमध्ये श्‍वेता बेलेकर, वक्स भाटकर, श्रावणी पाटील आणि सुमित शिंदे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
डीकेटीई संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाबरोबरच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये प्लेसमेंटच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करुन देत आहे. शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात. या दोन्ही क्षेत्रात डीकेटीई सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,उपाध्यक्ष प्रकाश आवाडे,मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी. अकिवाटे, डिप्लोमा प्रमुख प्रा.आर.के.वळसंग व इतर प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.