आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीची बदनामी करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा ग्रामसभेत जाहीर निषेध

ग्रामस्थांनी पुराव्यानिशी उघड केले सत्य

रत्नागिरी: नियाझ खान

दि.२५: आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीची आणि गावातील जलजीवन मिशन योजनेची चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या आणि उपोषणाच्या नावाखाली गावाची बदनामी करणाऱ्या तीन उपोषणकर्त्यांचा आंबव पोंक्षे येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच त्यांना चुकीच्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देणाऱ्या माजी सरपंचांवरही ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी श्री. सुरेश बाबू जुवळे श्री.विलास गोविंद मांडवकर आणि श्री. महेंद्र धोंडू पकडे हे ग्रामपंचायत आपल्याला विश्वासात न घेता पाण्याचे कनेक्शन तोडत असल्याचा आरोप करत उपोषणाला बसले होते.मात्र ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार,या तिघांनीही मागील १९ महिने पाणीपट्टी भरलेली नव्हती. त्यांना तीन वेळा कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि मागील दोन ग्रामसभांमधील ठरवाचा आधार घेऊनच योग्य प्रक्रियेद्वारे ही कारवाई करण्यात आली होती.यामध्ये कोणताही सूडबुद्धीचा हेतू नव्हता.उपोषणादरम्यान या तिघांनीही पंचायत समिती अधिकाऱ्यांसमोर ४ टप्प्यांत पाणीपट्टी भरण्याचे लेखी लिहून दिल्यानंतर, प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून ग्रामपंचायतीने त्यांचे कनेक्शन पुन्हा जोडून दिले आहे.
ग्रामसभेत उपोषणकर्त्यांनी केलेले सर्व आरोप पुराव्यानिशी फेटाळून लावण्यात आले.पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेताना फक्त विलास मांडवकर यांचा विरोध होता, तर गावातील सुमारे २०० ग्रामस्थांनी याला पूर्ण संमती दिली होती.विलास मांडवकर यांनी ६ महिन्यांचा पगार बाकी असल्याचा दावा केला होता. परंतु, ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या २०२४ पासूनच्या रेकॉर्डमध्ये त्यांची कर्मचारी म्हणून कुठेही नोंद नाही. पाईपलाईनचे पैसे मागण्याचा प्रयत्न: सुरेश बाळू जुवळे यांनी स्वतः ४०० मीटर पाईप टाकल्याचा दावा करत पैशांची मागणी केली होती.मात्र ग्रामपंचायतीने हे काम श्री.प्रसाद सुरेश भायजे यांना मक्तेदार म्हणून दिले होते. शासकीय पाईपलाईनचे पैसे जुवळे यांना देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
पकडेवाडी आणि भुवडवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसारच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गावात जलजीवन मिशनचे काम ९०% पूर्ण झाले असून ग्रामस्थ या कामावर पूर्णपणे समाधानी आहेत.या तिघांच्या चुकीच्या मागण्यांना आणि तक्रारींना पाठींबा देऊन गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच सुरेश लक्ष्मण भायजे करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता तहसीलदारांना शिफारस पत्र दिल्याबद्दल ग्रामसभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.या सर्व प्रकरणावर चर्चा करून शंकांचे निरसन करण्यासाठी ग्रामपंचायतीने या तिन्ही उपोषणकर्त्यांना स्वतंत्र पत्र देऊन ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते.मात्र आमचा विषय ग्रामसभेत नसून गटविकास अधिकाऱ्यांकडे आहे असे सांगत त्यांनी सभेला येणे टाळले. यावरून त्यांचा ग्रामसभेवर विश्वास नसल्याचे सिद्ध होते,अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
या काही व्यक्तींच्या सततच्या त्रासाला आणि गावविरोधी कारस्थानाला कंटाळून ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतला आहे. यापुढे या तीन ग्रामस्थांनी गावच्या संदर्भात केलेल्या कोणत्याही तक्रारी किंवा अर्ज प्रशासनाने ग्राह्य धरू नयेत अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद, तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयांना देण्याचे ग्रामसभेत ठरले आहे.दरम्यान, गावातील सर्व समावेशक कामे आणि योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल सरपंच श्री. शेखर उकार्डे,ग्रामपंचायत अधिकारी श्री. अभिजित चव्हाण, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे ग्रामस्थांनी एकमुखाने अभिनंदन केले.