इचलकरंजी : विजय मकोटे
दि.११ : शहरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या तसेच प्रभागातील सदस्य-सदस्या उपस्थित होते.
आयुक्तांनी छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसर, नोबेल हॉस्पिटल परिसर, पुजारी मळा, अयोध्या कॉलनी, सुदर्शन कॉलनी आणि योगायोग नगर या भागांना भेट देऊन सांडपाणी गटारे, कचरा संकलन व्यवस्था आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही ठिकाणी गटारांमध्ये गाळ साचलेला आढळून आल्याने तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने गटारे स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्याचा सुरळीत निचरा होणे आवश्यक असल्याने नियमित साफसफाई, कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हटविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांच्या पुनर्वसनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचीही आयुक्तांनी पाहणी केली. पुनर्वसन स्थळावरील उपलब्ध सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, वीजपुरवठा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आढावा घेऊन हातगाडे व्यावसायिकांना सुविधायुक्त व सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
यावेळी पुनर्वसन स्थळी मूलभूत सुविधा विकसित करण्यास प्राधान्य देण्याबरोबरच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. हातगाडे व्यावसायिकांचे पुनर्वसन नियोजनबद्ध पद्धतीने करून त्यांना व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आयुक्तांनी आण्णा रामगोंडा पाटील भाजी मार्केटचीही पाहणी केली. बाजार परिसरातील स्वच्छता, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, विक्रेत्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. बाजार परिसरात नियमित स्वच्छता राखणे, साचलेले पाणी तातडीने हटविणे आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच व्यापारी आणि विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
चर्चेदरम्यान भाजी मार्केटची इमारत सुमारे ४५ वर्षे जुनी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना आयुक्तांनी दिले.
यावेळी सहायक आयुक्त संतोष जिरगे, नगरसेवक नितेश पोवार, ओंकार सुर्वे, नगरसेविका सपना भिसे, उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, दीपक रावळ, सहायक आयुक्त नितीन बनगे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले, सहायक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, अविनाश मोरे, स्वच्छता निरीक्षक संदीप मधाळे, सचिन भुते आदी उपस्थित होते.