इचलकरंजी : विजय मकोटे
दि.११: पावसाळा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित व गळतीमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांनी पुढाकार घेत महापालिकेच्या विविध शाळांमधील छत गळती व दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार एकूण १३ शाळांची पाहणी करण्यात आली. यामध्ये सात शाळांमधील छतांची गळती दुरुस्त करणे तसेच उर्वरित सहा शाळांतील वर्गखोल्या व व्हरांड्यांमधील गळतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके तसेच कनिष्ठ अभियंता योगेश सुतार उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक शाळेतील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती कामांचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना शिक्षण सभापती विद्या साळुंखे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि पावसाळ्यात त्यांना सुरक्षित व आरामदायी वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व गळतीची कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”
या पाहणीमुळे महापालिका शिक्षण विभाग अधिक सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसांत सर्व दुरुस्ती कामांना वेग मिळणार आहे. शिक्षण सभापती आणि प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.