इचलकरंजी : विजय मकोटे
दि.११: जगातील पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये इचलकरंजीच्या दोन युवा योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकावला आहे. कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या सोहम योग अकॅडमीच्या वृंदा भूतडा आणि निवेश पाटील यांनी मिळून तीन सुवर्णपदके पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.फॉर्वर्ड बेंड कॅटेगरीमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वृंदा बालाप्रसाद भूतडा हिने नऊ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जगातील पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावणारी ती इचलकरंजीची पहिली कन्या ठरली आहे.
दुसरीकडे, निवेश नितेश पाटील याने सब-ज्युनिअर बॉईज गटात दैदिप्यमान कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकांची कमाई केली. पारंपरिक योगासन प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याने फॉरवर्ड बेंडिंग प्रकारातही सुवर्णपदक जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली. संगमनेर येथील राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धेतील रौप्यपदक आणि सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणीतून टीम इंडियामध्ये निवड, असा त्याचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे.
कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि योगासनांप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर या दोन्ही खेळाडूंनी जागतिक स्तरावर यश मिळवले आहे. त्यांच्या यशामागे प्रशिक्षक सुहास पवळे, पूनम खोत आणि निलेश कागीनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वृंदा भूतडा आणि निवेश पाटील यांच्या या अभूतपूर्व यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोहम योग अकॅडमी आणि कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषदेसाठीही ही अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.