भुयारी गटार योजनेतील त्रुटींवर व PMC वर कारवाईची मागणी; निकृष्ट कामांबाबत उमाकांत दाभोळे आक्रमक

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि.२६: शहरात सुरू असलेल्या ₹५२० कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी, निकृष्ट दर्जाचे रस्ता पुनर्स्थापना काम, पॅचवर्कमधील दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे चेंबर व पाईपलाईन बसविण्याचे प्रकार तसेच PMC (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी) कंपनीच्या निष्क्रियतेबाबत सखोल चौकशी करून संबंधित मक्तेदार, PMC कंपनी आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा इचलकरंजीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त,आणि महापौर, उपमहापौर यांना दिलेल्या निवेदनात दाभोळे यांनी नमूद केले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये भुयारी गटार योजनेची कामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. खुदाईनंतर रस्ते पूर्ववत करण्याऐवजी केवळ मुरूम किंवा माती टाकून खड्डे बुजविले जात असल्याने रस्ते खचत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले चेंबर निकृष्ट दर्जाचे असून काही ठिकाणी चेंबरची उंची, पातळी व स्थान चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भविष्यात सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पाईपलाईनची मांडणी तांत्रिक निकषांनुसार न करता घाईगडबडीत करण्यात आल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे अशा सर्व निकृष्ट दर्जाच्या चेंबर व पाईपलाईनची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषपूर्ण कामे संबंधित मक्तेदाराकडून पुन्हा योग्य पद्धतीने करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दाभोळे यांनी म्हटले आहे की, शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रयत्नांतून मंजूर करून आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हा शहराच्या विकासासाठी असून त्याचा विनियोग नियमानुसार, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही याची जबाबदारी प्रशासन, PMC कंपनी आणि संबंधित मक्तेदार यांच्यावर आहे. त्यामुळे कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.
दाभोळे यांनी PMC कंपनीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रकल्पाच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नियमित उपस्थित राहत नसल्याने गुणवत्ता नियंत्रणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, निकृष्ट किंवा अपूर्ण कामांची बिले रोखावीत, दोषी मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच कामांवर प्रभावी देखरेख न ठेवणाऱ्या PMC कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.   मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या हितासाठी उपोषण, आंदोलन व इतर लोकशाही मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही उमाकांत दाभोळे यांनी दिला आहे.