शाहुवाडी,: प्रतिनिधी :
दि .१ जुले २०२६ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाहुवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निघणाऱ्या रस्ते, गटारी व पुलांची कामे मुख्य ठेकेदारांकडून सब-ठेकेदार म्हणून पूर्ण करून देतात. त्यांनी शिराळे-वारूण पुलाचे तसेच कर्नाळवाडी (धनगरवाडा) ते सोनारवाडी (विरळे) या दोन किलोमीटर रस्त्याच्या मुरमीकरण व खडीकरणाचे काम पूर्ण केले होते.
या दोन्ही कामांची बिले मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांनी सुरुवातीला ३४ हजार ७०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रारदारांनी एसीबी, कोल्हापूरकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करताना वनमोरे यांनी तक्रारदाराकडे लाचेची रक्कम वाढवून ३८ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.यानंतर एसीबीने सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदारांकडून ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजयकुमार वनमोरे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी विजयकुमार विलास वनमोरे (मूळ रा. कराड, जि. सातारा; सध्या रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध शाहुवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे तसेच एसीबी, कोल्हापूरच्या पथकाने केली