पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीत चुरशीचा थरार:सहा बोट क्लबचा सहभाग,महिला भगिनींसह आबालवृद्धांची हजारोंची गर्दी

तरुण मराठा बोट क्लब ‘अ’ सांगलीवाडीचा प्रथम क्रमांक

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि.१५ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने पंचगंगा नदीत आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक होड्यांच्या भव्य शर्यतीत यंदा चुरशीचा थरार अनुभवायला मिळाला. सहा बोट क्लबच्या सहभागामुळे शर्यतीत सुरुवातीपासूनच कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. नदीच्या प्रवाहाला छेद देत वेगाने धावणाऱ्या होड्या, स्पर्धकांचा उत्साह आणि विजयासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू असलेली अटीतटीची लढत यामुळे पंचगंगा नदीकिनारा जल्लोषाने दुमदुमून गेला.
श्री वरद विनायक मंदिर परिसरातील पंचगंगा नदीपात्रात झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ मा आमदार सुरेशराव हाळवणकर, रविंद्र माने,माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रमोद बचाटे, सचिन माळी, राहुल जाणवेकर, संग्राम स्वामी, हणुमंत वाळवेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.सन १९७० पासून सुरू असलेली पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीची पारंपरिक जलक्रीडा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली.

वरद विनायक मंदिर भक्त मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
या स्पर्धेत तरुण मराठा बोट क्लब (अ), सांगलीवाडी; तरुण मराठा बोट क्लब (ब), सांगलीवाडी; डिग्रज बोट क्लब, डिग्रज; वरद विनायक बोट क्लब, इचलकरंजी; श्री हजरत सय्यद बादशहा बोट क्लब, कवठेसार; तसेच युवाशक्ती बोट क्लब, कवठेसार या सहा बोट क्लबनी सहभाग घेतला.  सर्वच बोट क्लबच्या स्पर्धकांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केल्याने शर्यतीत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. नदीच्या प्रवाहातून वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या होड्या आणि स्पर्धकांचा जोश पाहून प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला. अंतिम टप्प्यापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीने उपस्थितांना रोमांचित केले.

चुरशीच्या लढतीनंतर तरुण मराठा बोट क्लब (अ), सांगलीवाडी याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला २१ हजार १ रुपये रोख व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.द्वितीय क्रमांक युवाशक्ती बोट क्लब, कवठेसार याने मिळविला. त्यांना १५ हजार १ रुपये रोख व शिल्ड देण्यात आले.तृतीय क्रमांक डिग्रज बोट क्लब, डिग्रज याने पटकावला. त्यांना ११ हजार १ रुपये रोख व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.तर चतुर्थ क्रमांक वरद विनायक बोट क्लब, इचलकरंजी याने मिळविला. त्यांना ७ हजार १ रुपये रोख व शिल्ड प्रदान करण्यात आले.

विजेत्या बोट क्लबना आमदार अशोकराव माने (बापू), रवींद्र माने जिल्हाध्यक्ष शिवसेना, माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे, महाजन गुरुजी,अशोक स्वामी, माजी नगरसेवक दिलीप मुथा, के व्हि पालनकर ,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागाते, म्हाळसाकांत कवडे या मान्यवराच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी बाळासो जांभळे, प्रकाश कलागते, शितल पाटील, विष्णुपंत, प्रशांत चाळके, शिंदे, शिवबसु खोत, विनायक रेडेकर, सुनील ताडे, बाळकृष्ण मिठारी, सलीम शिकलगार गजानन स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
होड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी महिला भगिनी, लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने नदीकिनारी गर्दी केली होती. सीमाभागासह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी पंचगंगा नदीकाठी उपस्थिती लावली.
नदीकिनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणात नागरिकांनी होड्यांच्या शर्यतीचा आनंद घेत चिरमुरे, फराळ तसेच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या पारंपरिक जलक्रीडेचा मनमुराद आनंद घेतला. होड्यांचा वेग, स्पर्धकांचा जोश आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.स्पर्धेचे नियोजन शिस्तबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. ही पारंपरिक जलक्रीडा स्पर्धा उत्साहात व सुरळीतपणे पार पडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहकार्य बद्दल अध्यक्ष अशोक स्वामी, तसेच श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळ व बोट क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी पोलिस, महापालिका, पत्रकार सह स्पर्धक, मान्यवर, पंचक्रोशीतील नागरिक, महिला भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, प्रेक्षक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.१९७० पासून सुरू असलेली ही पारंपरिक जलक्रीडा स्पर्धा आता केवळ होड्यांची शर्यत न राहता इचलकरंजीकरांना एकत्र आणणारा आनंदोत्सव बनली आहे. पंचगंगेच्या निसर्गरम्य सान्निध्यात, स्वातंत्र्यदिनाच्या उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेने इचलकरंजीच्या पारंपरिक जलक्रीडा संस्कृतीला पुन्हा एकदा उजाळा दिला.