एलएलबीमध्ये प्रथम श्रेणी; मिसबाह शेख ठरल्या समाजातील पहिल्या महिला वकील

भटके-विमुक्त मुस्लिम छप्परबंद समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा; जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर यशाची उत्तुंग भरारी

जयसिंगपूर :कयुम शेख 

दि.१५ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सौ. मिसबाह इम्रान शेख यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, भटके-विमुक्त मुस्लिम छप्परबंद समाजातील पहिल्या महिला वकील होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.लहानपणापासूनच शिक्षणाची कास धरलेल्या मिसबाह शेख यांनी अनेक अडचणींवर मात करत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच त्यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.‘मुलगी शिकली तर समाज घडतो’ या विचाराला आपल्या कर्तृत्वातून त्यांनी प्रत्यक्षात उतरविले आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनीही आपल्या क्षमतांना नवी दिशा द्यावी, याचे त्या प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
मिसबाह यांच्या या यशामुळे समाजातील मुलींमध्ये शिक्षणाबाबत नवा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार असून, अनेक मुलींना उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा मिळणार आहे. विशेषतः कायद्याच्या क्षेत्रात समाजातील महिलांसाठी त्यांनी एक नवा मार्ग खुला केला आहे.त्यांच्या या यशाकडे केवळ एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक यश म्हणून न पाहता, संपूर्ण समाजासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब म्हणून पाहिले जात आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगती साधता येते, हे मिसबाह शेख यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
एलएलबीमध्ये प्रथम श्रेणी आणि समाजातील पहिल्या महिला वकील होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मिसबाह शेख यांच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कायदेविषयक कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.