प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे धोकादायक : सचिन गोवळकर

मंडणगड: प्रतिनिधी
दि.२०: कोणतीही घटना डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी ‘का ?’, ‘कसे ?’ आणि ‘यामागे काय कारण आहे ?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लागणे, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी केले.
     जिल्हा परिषद नूतन विद्यामंदिर, मंडणगड येथे तालुक्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार सादरीकरण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नूतन विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शांताराम पवार तसेच तालुक्यातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन गोवळकर म्हणाले की, “आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने प्रगत केलेली विविध साधने वापरतो. आपण विज्ञानाची साधने स्वीकारली, विज्ञानाची करणी घेतली; मात्र विज्ञानाची विचारसरणी स्वीकारली नाही, ही आजच्या समाजासमोरील मोठी विसंगती आहे.”वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ विज्ञानाच्या प्रयोगशाळेपुरता मर्यादित नसून, तो विचार करण्याची आणि कृती करण्याची पद्धत आहे. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग यांच्या आधारे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची चिकित्सा करता येते.
    आजवर मानवाने केलेली प्रगती विज्ञानाच्या आधारावर झाली आहे. मोबाईल, इंटरनेट, वाहतूक, वैद्यकीय सुविधा यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य सुविधा आपण विज्ञानामुळे वापरत आहोत. मात्र विज्ञानाची साधने वापरताना त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनही आपल्या दैनंदिन जीवनात रुजविण्याची गरज आहे.. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकावर सोपविलेले मूलभूत कर्तव्य आहे, याची जाणीवही त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.कार्यक्रमादरम्यान विविध तथाकथित चमत्कारांचे सादरीकरण करून दाखविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक चमत्कारामागील विज्ञान, हातचलाखी आणि तांत्रिक कौशल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तथाकथित चमत्कारांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले.