कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.२९: रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आपल्या कुटुंबीयांपासून व बहिणींपासून दूर असलेल्या कळंबा कारागृहातील बंदी बांधवांसाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास दृढ करणारा भावनिक बंध आहे. या भावनेतून कारागृहातील बंदी बांधवांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपुलकीची ऊब मिळावी, त्यांना आपल्या घरच्या माणसांची आठवण कमी व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने भागीरथी महिला संस्थेच्या सभासद भगिनींनी बंदी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
राखी बांधण्याच्या या भावनिक क्षणी अनेक बंदी बांधवांच्या डोळ्यांत भावनांचा ओलावा तर चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून आले. काही काळासाठी का होईना, कारागृहातील वातावरणात कौटुंबिक जिव्हाळ्याची अनुभूती निर्माण झाली. माणुसकी, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. या उपक्रमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, तसेच चुकलेल्या व्यक्तींमध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण व्हावी, असा मानवतावादी संदेश देण्यात आला.
यावेळी कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, उपअधीक्षक सायबर आडे, वरिष्ठ जेलर रमेश मेंडके, निखिल ढेरे गुरुजी तसेच कारागृहातील अधिकारी, भागीरथी महिला संस्थेच्या सभासद भगिनी आणि बंदी बांधव उपस्थित होते.