मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे — रोहन पांडे, नागपूर

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि.२९: रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने ‘विवेकी’ या भावनिक तंदुरुस्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा विशेष मोफत सेमिनार नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ व प्रशिक्षक रोहन पांडे , नागपूर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत डॉ.अजिंक्य गोडसे यांनी घेतली. या संवादातून मानसिक आरोग्य, विचार, भावना आणि वर्तन यांच्यातील परस्परसंबंध याबाबत उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

यावेळी बोलताना रोहन पांडे यांनी, मानसिक त्रास होत असल्याचे स्वीकारणे आणि योग्य वेळी त्यासाठी उपचार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींना उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणे हीदेखील समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

“       आपण आपल्या विचारांकडे लक्ष दिले पाहिजे. एखादा प्रसंग आपल्याला भावना देत नाही, तर त्या प्रसंगाबद्दलचे आपले विचारच आपल्या भावनांना आकार देतात,” असे पांडे यांनी स्पष्ट केले. नकारात्मक व अडथळा आणणारे विचार ओळखणे, कठीण भावनांचे प्रभावी नियमन करणे आणि विचार, भावना व वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी विवेकी विचारसरणी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा अधिक संवेदनशील आणि विवेकी दृष्टिकोन मिळाला. रोटरी श्री राम विलास बाहेती सेवा केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमा वेळी पाहुण्यांचे व उपस्थिततांचे स्वागत रोटरीचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी केले श्री विवेक पांडे यांची ओळख डॉक्टर अजिंक्य गोडसे यांनी करून दिली आभार प्रदर्शन रो. सुनील येळरुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रोजेक्ट चेअरमनरो. संजय खोत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास रोटरीचे सदस्य प्रोबस क्लबचे सदस्य निमंत्रित मोठ्या संख्येने हजर होते.