इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१८ : महावितरण कंपनीचे प्रकाशगड मुंबईचे संचालन (ऑपरेशन) संचालक धनंजय औंढेकर कोल्हापूर येथे आलेवेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे इचलकरंजी शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्या व २० किलोवॅटपेक्षा कमी मंजूर भार असलेल्या यंत्रमाग वीज ग्राहकांना MD शुटमुळे आलेल्या भरमसाठ वीज बिलाबाबतचे निवेदन देणेत आले. यावेळी महावितरणचे कोल्हापूर डिव्हीजनचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, अधिक्षक अभियंता गणपत लटपटे, इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसाद अवघडे, सारंग हातोळकर व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापुरे यांनी इचलकरंजी शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांमुळे यंत्रमागधारकांसह विविध उद्योगांतील उद्योजकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीला इचलकरंजी परिसरातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानाही आवश्यक तांत्रिक कर्मचारी, तक्रार निवारणासाठी वाहन, उपकेंद्रांची पुरेशी क्षमता आणि वीजपुरवठा यंत्रणेच्या देखभालीच्या बाबतीत अनेक अडचणी कायम आहेत. इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला असताना शहराच्या वाढत्या औद्योगिक गरजा आणि वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन महावितरण कार्यालयात आवश्यक तेवढे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामी, वीज ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महावितरण कार्यालयातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी. वीज ग्राहकांना दर्जेदार व तातडीची सेवा मिळणे आवश्यक आहे. वीजवाहिन्या व इतर विद्युत यंत्रणांमधील बिघाड दूर करण्यासाठी तक्रार निवारण पथकासह लॅडर व्हेईकल (शिडी वाहन) उपलब्ध करून द्यावे. यामुळे तांत्रिक बिघाड त्वरित दूर होऊन यंत्रमागधारकांचा वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी कमी होईल आणि उत्पादनाचे नुकसान टाळता येईल.
त्याचबरोबर इचलकरंजीतील आवाडे सबस्टेशन जुने झाल्यामुळे या ठिकाणी वारंवार देखभाल व दुरुस्तीची कामे करावी लागतात. परिणामी, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असून औद्योगिक उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. नाईक मळा येथे उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणेत आलेली आहे. त्यामुळे नाईक मळा येथे नवीन वीज उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असे सांगितले.
दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे संचालक सतीश कोष्टी यांनी लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट आणि पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट येथे तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता ही गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्रीच्या पाळीत तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यास उद्योजकांना संपूर्ण रात्र कारखाने बंद ठेवावे लागतात. त्यामुळे उत्पादन ठप्प होऊन मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या समस्येबाबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, अद्यापही यावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये आवश्यक तांत्रिक कर्मचारी नेमावेत आणि पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्रपाळीसाठी तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.
इचलकरंजी व परिसरातील २० किलोवॅटपेक्षा कमी मंजूर भार असलेल्या यंत्रमाग वीज ग्राहकांना MD शुटमुळे केव्हीएएच (kVAh) पद्धतीने वीजबिले देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांची वीजबिले पूर्वीच्या तुलनेत जवळपास तीन ते चार पट वाढली आहेत. ही बाब लहान यंत्रमागधारकांसाठी अत्यंत गंभीर असून त्यांना एवढी वाढीव बिले भरणे आर्थिकदृष्ट्या अशक्य होत आहे. केव्हीएएच (kVAh) पद्धतीबाबत महावितरणकडून संबंधित ग्राहकांना पूर्वसूचना किंवा पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे वीज ग्राहक अनभिज्ञ होते. अचानक वाढीव वीजबिले आल्याने लहान कारखानदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना देण्यात आलेली वाढीव केव्हीएएच बिलाऐवजी केडब्ल्यूएच (kWh) पद्धतीने वीजबिले देण्यात यावी असे सांगितले.
महावितरण कंपनीचे संचालन (ऑपरेशन) संचालक धनंजय औंढेकर यांनी उपस्थित केलेल्या समस्या प्राधान्याने दूर करून यंत्रमागधारक व महावितरण यांच्यातील संबंध जास्तीत जास्त दृढ करण्याचे प्रयत्न होतील. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनाही विषय त्वरीत मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. त्याचबरोबर MD शुट होऊन वाढून आलेल्या वीज बिलांबाबत सकारात्मक विचार करून योग्य ती पावले उचलनेत येतील असे आश्वासन दिले. सदर मीटिंगला दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी व पांडूरंग सोलगे उपस्थित होते.