इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.१६: इचलकरंजी महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वानिमित्त नागरिक व भाविकांच्या सोयीसाठी श्री महालक्ष्मी दर्शनासाठी विशेष ई-बस सेवा दिनांक १५ /१०/२०२६ ते21/१०/२०२६ अखेर सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे इचलकरंजी शहर व परिसरातील भाविकांना नवरात्रोत्सव काळात श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.सदर विशेष ई-बस सेवा सुरू करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापती सौ. अरुणा प्रमोद बचाटे यांनी विशेष प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जात असल्याने त्यांना सुलभ व किफायतशीर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
तसेच माननीय आमदार राहुलजी आवाडे यांनीही भाविकांच्या सोयीसाठी ही विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सो यांना पत्र देऊन पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग यांचे मंजुरी व आरटीओ कोल्हापूर यांची एनओसी मिळाली आहे. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
याबरोबरच माननीय महापौर व आयुक्त यांनीही याकडे विशेष लक्ष देत परिवहन विभागाशी आवश्यक समन्वय साधून भाविकांना नवरात्रोत्सव काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष ई-बस सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. नवरात्रोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेली ही विशेष ई-बस सेवा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.इचलकरंजी शहर व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी श्री महालक्ष्मी दर्शनासाठी महानगरपालिकेच्या या विशेष ई-बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.