महिला आणि युवतींच्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१८ ऑक्टोबर-: येथील मनोरंजन मंडळ महिला विभाग आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ॲन्स कमिटी यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महिला आणि युवतींसाठी प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा आणि मराठी भावगीत गायन कार्यक्रम, असा दोन दिवसीय उपक्रम उत्साहात पार पडला.उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात स्वतःच्या हातावर मेंदी काढणे ही स्पर्धा पार पडली. यामध्ये अमृता मोरे यांनी प्रथम क्रमांक व सनोबर मेमन यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. दिपाली पवार यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला तर कोमल लोकरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी परीक्षक या नात्याने सौ. माया भाटले जाधव आणि सौ. विलेशा वेटे यांनी जबाबदारी पार पाडली.

दुपारच्या सत्रात समई सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनिता कबाडे यांनी प्रथम क्रमांक, कोमल लोकरे यांनी द्वितीय क्रमांक तर श्वेता शहा यांनी तृतीय क्रमांक मिळविला. वैशाली फाटक आणि प्रणाली गंगाधरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. यावेळी परीक्षक म्हणून सौ. मीनाक्षी तंगडी आणि पुष्पा पोतदार वशीकर यांनी काम पाहिले. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात वेशभुषा स्पर्धा पार पडली. यामध्ये सारिका सवदी यांनी प्रथम क्रमांक, अनिता कबाडे यांनी द्वितीय क्रमांक तर साक्षी गजरे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. सायली होगाडे आणि सौ. शर्वरी गोवंडे यांनी जबाबदारी पार पाडली.

यावेळी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्वरमयी कोल्हापूर प्रस्तुत ‘गीत अंतरीचे’ हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. प्रसिद्ध गायिका सविता कबनूरकर यांनी गणेश स्तुतीने या श्रवणीय कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी त्यांनी गुणी बाळ असा, हृदयी प्रीत जागते, तुला पाहते मी, इत्यादी भावगीते व भक्ती गीते अशी विविध प्रकारची गाणी सादर केली. त्याचबरोबर त्यांनी व संगीत संयोजक उमेश नेरकर यांनी देवीचा गोंधळ उत्तमपणे सादर केला. कार्यक्रमासाठी हार्मोनियम साथ नेरकर यांनी, तबला साथ विनायक लोहार यांनी तर तालवाद्य साथ अभिजीत पोतदार यांनी उत्कृष्टपणे केली. ध्वनि व्यवस्था होगाडे जॉबर यांची होती.

सुरुवातीला कलाकारांचे स्वागत महिला विभागाच्या अध्यक्षा जागृती शहा यांनी केले तर ॲनस् कमिटी चेअरमन सायली बंब यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्वरी गोवंडे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख राजेश्वरी सवदी यांनी करून दिली. स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ पाहुणे कलाकार व संयोजक पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विमलकुमार बंब व सेक्रेटरी प्रमोद महाजन, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे आणि स्पर्धा समन्वयक दिप्ती कुलकर्णी, इ. उपस्थित होते. शेवटी संगीता गजरे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महिला विभाग आणि ॲनस् कमिटीच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या.